रिलायन्स जिओमुळे चिनी कंपन्यांचे मनोबलही उंचावले

सण-समारंभाची रेलचेल असलेल्या २०१६ च्या दुसऱ्या तिमाहीत भारतीय ग्राहकांकडून मोबाइल फोनची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच  बहुप्रतीक्षित रिलायन्स जिओ ही सेवाही याच दरम्यान सुरू होण्याच्या आशेने विशेषत: चिनी मोबाइल निर्मात्या कंपन्यांचे मनोबल उंचावले आहे.

भारतात एप्रिल ते जून २०१६ दरम्यान ६.५९ कोटी मोबाइलची आयात नोंदली गेली होती. यामध्ये ३.७३ कोटी फीचर तर २.८७ कोटी हे स्मार्टफोन होते. एकूण आयात मोबाइलमधील त्याचा हिस्सा अनुक्रमे ५६.५ व ४३.५ टक्के होता. आधीच्या, जानेवारी ते मार्च या २०१६ मधील पहिल्या तिमाहीतील आयात मोबाइलपेक्षा हे प्रमाण २४ टक्क्यांनी अधिक होते. तिमाहीत फीचर फोनचे प्रमाण २७.७ तर स्मार्टफोनचे प्रमाण १९.५ टक्क्यांनी वाढले आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणारा सातवा वेतन आयोग, उत्तम मान्सून तसेच सण समारंभाची सुरू होत असलेला हंगाम यामुळे खरेदीदारांकडून यंदा अधिक मोबाइलची मागणी नोंदविली जाण्याची शक्यता ‘सीएमआर’ या अभ्यास संस्थेने व्यक्त केली आहे. रिलायन्स जिओमार्फत सुरू होणारी दूरसंचार सेवा आणि परिणामी तयार होणारी कंपन्यांमधील स्पर्धा यामुळेही या उद्योगाला यंदा अधिक चालना मिळण्याचा विश्वास ‘सीएमआर’चे विश्लेषक फैसल कावूसा यांनी या अहवालाद्वारे व्यक्त केला आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण बाजारपेठेतूनही नव्या मोबाइलसाठीची मागणी वाढणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत सध्या २५.५ टक्क्यांसह कोरियन कंपनी सॅमसंग ही आघाडीवर आहे. तर १३.६ टक्क्यांसह मायक्रोमॅक्स स्थानिक कंपनी दुसऱ्या स्थानावर आहे. अन्य आघाडीच्या पाच कंपन्यांचा बाजारहिस्सा १० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. २०,००० रुपयांवरील किमतीच्या स्मार्टफोनची बाजारपेठ दुसऱ्या तिमाहीत ३५ टक्क्यांनी वाढली आहे.