गुंतवणूकदार मत्तेत ३ लाखांची तूट
सेन्सेक्समध्ये ६ टक्क्य़ांची घसरण
२०१५ सप्टेंबपर्यंतची नऊमाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रातील सत्तापालटाने हर्षवायू जडलेल्या बाजाराने या सरकारला वर्ष पूर्ण होईपर्यंत दाखविलेली जोमदार मुसंडी मारली. परंतु या सरकारने दीड वर्षांचा टप्पा ओलांडेपर्यंत, भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांक पूर्वपदाला गवसणी घालत, जेथून सुरू केले त्याच पातळीवर घरंगळल्याचे दिसून येत आहे.
विद्यमान २०१५ सालाच्या पहिल्या नऊ महिन्यांत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स जवळपास ६ टक्क्य़ांनी (डिसेंबर २०१४ अखेर पातळीच्या तुलनेत) घसरला आहे. तर गुंतवणूकदारांची मालमत्ताही ३ लाख कोटी रुपयांनी रोडावली आहे. बाजारात सूचिबद्ध सर्व कंपन्यांच्या समभागांचे बाजार मूल्य जे बराच काळ १०० लाख कोटींपल्याड होते ते आता थेट ९५.४० लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले आहे.
मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांनी १०० लाख कोटी रुपयांचा पल्ला २०१४ मध्ये गाठला होता. २०१५ मध्येही हा टप्पा काही महिन्यांमध्ये नोंदविला गेला. २४ सप्टेंबर २०१५ पर्यंत मात्र ही रक्कम ९५.४० कोटी रुपये झाली आहे. त्यात २.९५ लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.
२०१४ मध्ये मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता २८ लाख रुपयांनी वाढली होती. या कालावधीत बाजारातील कंपन्यांची मालमत्ता ९८.३६ लाख कोटी रुपये होती. मात्र गेल्या काही तिमाहीतील चिंताजनक अर्थव्यवस्थेचा फटका २०१५ मध्ये बाजाराला बसला आहे.
चालू वर्षांत आतापर्यंत सेन्सेक्समध्ये १,६३५.९२ अंश घसरण होऊन निर्देशांक २५,८६३.५० पर्यंत खाली आला आहे. टक्केवारीत ही घसरण ५.९४ आहे. चालू वर्षांतच मुंबई निर्देशांकाने ४ मार्च २०१५ रोजी ३०,०२४.७४ हा सर्वोच्च स्तर नोंदविला होता.
२०१५ मध्ये ८ सप्टेंबर रोजी सेन्सेक्सचा २४,८३३.५४ या वर्षांतील तळ राखला गेला आहे. २४ ऑगस्ट रोजी मुंबई निर्देशांकाने एकाच व्यवहारात तब्बल १,६२४.५१ अंश आपटी नोंदवित काळ्या सोमवारची नोंद केली होती. या एकाच दिवशी ७ लाख कोटी रुपयांची संपत्ती रोडावली.
जानेवारी ते डिसेंबर २०१४ दरम्यान सेन्सेक्सने ६,३२८.७४ अशी तब्बल ३० टक्क्य़ांची वाढ नोंदविली होती. २००९ नंतरची ही सर्वात मोठी वार्षिक निर्देशांक झेप होती. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून विदेशी गुंतवणूकदारांनीोत्र ५,००० कोटी रुपये बाजारातून काढून घेतले आहेत.

पुन्हा पूर्वपदाला!
१६ मे २०१४ रोजी पंतप्रधान मोदी यांनी सत्तारोहण केले, त्या दिवशी सेन्सेक्स मोठय़ा उसळीसह २४,१२१ अंशांवर बंद झाला होता. निफ्टी निर्देशांकाची पातळीही तेव्हा ७,२०३ होती. त्यानंतरचा बाजाराचा काळ हा अभूतपूर्व तेजीचा होता. अल्पावधीतच म्हणजे ४ मार्च २०१५ रोजी सेन्सेक्सने ३० हजाराची पातळीही ओलांडली. तर तितक्याच गतीने पुढे सेन्सेक्सची उतरंड सुरू झाली आणि ८ सप्टेंबपर्यंत सेन्सेक्सने २४,८३३.५४ या वर्षांतील नीचांक स्तरावर रोडावला.