युरोपीय समुदाय व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनी ग्रीसवर दडपण आणले असून रविवारच्या सार्वमतापूर्वी देशापुढील आर्थिक धोक्यांची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे. रविवारच्या सार्वमतात युरोझोनचे भवितव्य ठरणार असून ग्रीसने युरोझोनमध्ये रहावे की नाही याचा निर्णय लोक करणार आहेत.
ग्रीसमधील डाव्या नेत्यांनी रविवारच्या सार्वमतात त्यांचे राजकीय सामथ्र्य पणाला लावले असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आर्थिक भवितव्याबाबत ग्रीसला धोक्याचा इशारा दिला आहे. तेथे जानेवारीत सिरझिया पक्ष सत्तेवर आल्यानंतर आर्थिक स्थिती कमालीची घसरली आहे.
नाणेनिधीने म्हटल्यानुसार वर्षांत ग्रीसची वाढ २.५ टक्क्य़ांवरून शून्य टक्क्य़ांवर येणार आहे व त्यांना पुढील तीन वर्षे अर्थव्यवस्थेत स्थिरता आणण्यासाठी ५० अब्ज युरो (५५ अब्ज डॉलर्स) लागतील. युरोपीय समुदाय, नाणेनिधी व युरोपीय स्थिरता यंत्रणा यांनी ग्रीसला २०१० पासून २४० अब्ज युरोंचे कर्ज दिले असून त्यांच्या मते ग्रीसला पुन्हा सवलती दिल्या तर युरोपला फटका बसू शकतो. ग्रीसचे अर्थमंत्री यानिस वारोफकीस यांनी सांगितले की, जर सार्वमताचा निकाल विरोधात गेला तर सरकार राजीनामा देईल. पण, पंतप्रधान अलेक्सिस सिप्रास यांनी मात्र त्याबाबत शंका व्यक्त केली आहे. युरोपीय संसदेचे अध्यक्ष मार्टिन शुल्झ यांनी म्हटले आहे की, ग्रीसचे नेते फार खालच्या पातळीला गेले असून जर लोकांनी होकारार्थी मतदान केले तर ग्रीसमध्ये पुन्हा निवडणुका होतील. रविवारच्या सार्वमताच्या वैधतेबाबत उद्या ग्रीसचे सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून त्यावर या सार्वमताचे भवितव्य अवलंबून असेल; म्हणजे ते रद्दही होऊ
शकते.