अभिजन ग्राहकवर्गात लोकप्रिय फॅशन वस्त्रांची निर्माता मॉन्टे कालरे फॅशन्स लिमिटेड या कंपनीने प्रारंभिक खुल्या भागविक्रीतून भांडवली बाजारात प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून ५४.३३ लाख समभागांची विक्री प्रत्येकी किमान ६३० रु. आणि कमाल ६४५ रु. या दरम्यान बोली पद्धतीने येत्या ३ डिसेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान केली जाईल. अशा तऱ्हेने भागविक्रीतून ४०० कोटी रुपयांचा निधी उभा राहणे कंपनीला अपेक्षित आहे. चालू वर्षांत मुख्य शेअर बाजारात सूचिबद्धतेसाठी भागविक्री घेऊन येणारी मॉन्टे कालरे ही पाचवी कंपनी आहे.
मॉन्टे कालरे हे विणलेल्या लोकरीच्या तयार वस्त्रांचे ‘सुपरब्रॅण्ड’ म्हणून ख्यातकीर्त असून, गेल्या या नाममुद्रेअंतर्गत अन्य प्रकारच्या फॅशनवस्त्रांचाही समावेश करून, महिला आणि बालकांसाठी तयार वस्त्रांच्या श्रेणीही बाजारात आल्या आहेत. देशभरातील १३०० हून अधिक आधुनिक विक्री दालनांमध्ये तसेच स्व-मालकी व फ्रँचाइजी तत्त्वावरील सुमारे १५० दालनांमधून त्यांची विक्री केली जाते.
या भागविक्रीतून या कंपनीच्या भागभांडवलात सध्या १८.५१ टक्के हिस्सा असलेल्या समारा कॅपिटलचा ७.५१ टक्के (४० टक्के) हिस्सा सौम्य होणार आहे, तर प्रवर्तकांचा हिस्साही ६३.८ टक्क्यांपर्यंत सौम्य होणार आहे. समारा कॅपिटल या खासगी गुंतवणूकदार कंपनीने कांची इन्व्हेस्टमेंट या उपकंपनीमार्फत माँटे कालरेमध्ये जून २०१२ मध्ये ९४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
एसबीआय कॅपिटल मार्केट्स, अ‍ॅक्सिस कॅपिटल, एडेल्वाइज फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस आणि रेलिगेअर कॅपिटल मार्केट्स यांच्याकडून या भागविक्रीचे व्यवस्थापन पाहिले जाणार आहे.
किरकोळ व्यक्तिगत गुंतवणूकदारांना या भागविक्रीत किमान २३ समभागांसाठी आणि त्यापुढे २३ समभागांच्या पटीत बोली लावता येईल.

नजीकच्या काळातील कंपन्यांच्या संभाव्य भागविक्री  
चालू वर्षांत मुख्य शेअर बाजारात सूचिबद्धतेसाठी भागविक्री घेऊन येणारी मॉन्टे कालरे ही पाचवी कंपनी आहे. या आधी शारदा क्रॉपकेम (३५१ कोटी), स्नोमॅन लॉजिस्टिक्स (१९७ कोटी), वंडरेला हॉलिडेज् (१८१ कोटी) आणि शेमारू एंटरटेन्मेंट (१२० कोटी रुपये) अशा चार कंपन्यांच्या भागविक्रींना गुंतवणूकदारांचा भरभरून प्रतिसाद दिसून आला आहे. दोन्ही शेअर बाजारांच्या एसएमई मंचावर मात्र २३ सूक्ष्म, लघू व मध्यम आकारमानाच्या कंपन्यांनी भागविक्रीतून आजवर १७३ कोटी रुपये एकत्रितपणे उभे केले आहेत. या व्यतिरिक्त आणखी सुमारे २० कंपन्यांनी भागविक्रीसाठी ‘सेबी’कडून हिरवा कंदील मिळविला आहे. या कंपन्या अपेक्षेप्रमाणे भागविक्री घेऊन आल्यास, प्राथमिक भांडवली बाजारातून चालू वर्षांत सुमारे ७,००० कोटी उभे राहतील. यात प्रामुख्याने लव्हासा कॉर्पोरेशन, आयनॉक्स विंड लिमिटेड, राष्ट्रीय इस्पात निगम लि. आदींचा समावेश असेल.