विविध उद्योगधंद्यांमध्ये सुरू असलेली आजवरची पारंपरिक पद्धती विस्कळीत करणारे नवोन्वेषण, जगभरात सर्वत्र होत असलेल्या मोठय़ा राजकीय घडामोडी, त्यामुळे दाटून आलेले मळभ या साऱ्या पाश्र्वभूमीवर भारताच्या माहिती-तंत्रज्ञान आणि बीपीएम उद्योगाचा विकास दर २०१७ या आर्थिक वर्षांत ८.६ टक्क्यांचाच असेल आणि एकूण उद्योगातून मिळणारा महसूल १५५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असे माहिती तंत्रज्ञान उद्योगाची शिखर संस्था असलेल्या नासकॉमतर्फे बुधवारी जाहीर करण्यात आले.

आता वेळीच या उद्योगातील बदलांचे वारे लक्षात घेऊन कंपन्यांनी व कर्मचाऱ्यांनी स्वत:मध्ये बदल केले नाहीत तर रोजगार गमावणाऱ्यांची संख्याही अधिक असेल, असा इशाराही नासकॉमने आपल्या या वार्षिक आढावा बैठकीतून दिला.

नासकॉमचे अध्यक्ष आर. चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, आता सर्वानाच डिजिटल मार्गाने जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या स्पर्धेत टिकायचे तर माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कंपन्यांना डिजिटल तर व्हावेच लागेल पण त्याचबरोबर त्यांचे आराखडे आणि धोरणेही बदलावी लागतील. या नव्या डिजिटल बदलांमुळे खूप मोठय़ा प्रमाणावर नवीन संधीही उपलब्ध होतील. पण जे बदलांना आपलेसे करतील, त्यांच्याचसाठी या संधी असतील. अन्यथा रोजगार गमावण्याची वेळ येईल. अनेकांनी गेल्या वर्षांत अशा प्रकारे रोजगार गमावलेला देखील आहे.

जगभरातील सध्याची राजकीय परिस्थिती अनेक चढउतारांची आहे, तरीही भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा विकास दर ८.६ असणे ही निश्चितच आशादायक गोष्ट आहे, असे सांगून नासकॉमचे सरचिटणीस सीपी. गुरनानी म्हणाले की, यंदाच्या आर्थिक वर्षांत माहिती तंत्रज्ञान निर्यातीतून भारताला मिळणारा महसूल ११८ दशकोटी अमेरिकन डॉलर्सचा असेल. तर देशांतर्गत बाजारपेठ प्रतिवर्षी १२ टक्क्यांनी वाढत असून तीही या आर्थिक वर्षांत दोन हजार पाचशे पंचेचाळीस दशकोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. सध्या या उद्योगामध्ये ३० लाख ८६ हजार कर्मचारी कार्यरत असून त्यात गेल्या वर्षी १० लाख ७० हजारांची भर पडली आहे. कर्मचारी वाढ सुमारे पाच टक्क्यांच्या आसपास आहे.

चालू आर्थिक वर्षांत एकूण महसुलापैकी १४ टक्के वाटा डिजिटल उद्योगांचा आहे. येणारा काळ हा डिजिटलच असणार असून हा बदल अटळ आहे म्हणूनच नासकॉमच्या पुढाकाराने डिजिटल कौशल्ये कर्मचाऱ्यांमध्ये विकसित     करण्यासाठी एक मोहीम आखण्यात आली असून त्यासाठी ‘बीसीजी’सोबत

करारही करण्यात आला आहे. त्यामुळे या उद्योगात असलेल्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये डिजिटल कौशल्य विकसित करण्यास मदतच होईल.

 

वाढीला ‘ट्रम्प’अडसर नव्हे संधी – अंबानी

ट्रम्प यांनी राबविण्यास सुरुवात केलेल्या धोरणांचा सर्वाधिक परिणाम भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगालाच बसेल, असा अंदाज गेले काही दिवस व्यक्त होत आहे. या अंदाजाची चर्चा बुधवारी नासकॉमच्या अधिवेशनातही सुरू होती. याच अधिवेशनात एका जाहीर मुलाखतीदरम्यान रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी म्हणाले की, ‘संकटातही संधी’ हा शब्दप्रयोग अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यानिमित्ताने भारताला अनुभवायला मिळेल, असे दिसते आहे. भारताच्या देशांतर्गत बाजारपेठेच्या विकासासाठी ही मोठी संधी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर नासकॉमचे सरचिटणीस सीपी गुरनानी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, ट्रम्प यांच्या धोरणांचा भारताला खासकरून माहिती तंत्रज्ञान उद्योगातील कंपन्यांना फारसा फटका बसणार नाही. अमेरिकन कंपन्यांनी असे आश्वासन नासकॉमला दिले आहे. त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे.