मर्सर संस्थेच्या जागतिक सर्वेक्षणात ५७ वा क्रमांक

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे आकर्षण जगभरातील लोकांना आहे. मुंबईतील वैभवशाली वास्तू पाहण्यासाठी, येथील समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील पर्यटक येतात. अनेक नागरिक नोकरीनिमित्त, शिक्षणासाठीही मुंबईत येतात. मात्र मुंबई हे पर्यटकांसाठी आणि नोकरीनिमित्ताने आलेल्या नागरिकांसाठी महाग शहर ठरले आहे. येथे होणारा अर्थार्जनाचा खर्च हा अधिक आहे. याबाबत जागतिक क्रमवारीत मुंबईचा ५७वा क्रमांक लागतो. २०१६ साली मुंबईचा याबाबत ८२वा क्रमांक होता.

मर्सर संस्थेतर्फे  दरवर्षी जगभरातील शहरांमधील जीवनावश्यक खर्चाबाबत सर्वेक्षण केले जाते. यंदा केलेल्या सर्वेक्षणात मुंबई ५७व्या क्रमांकावर आहे. अँगोला या देशाची राजधानी असलेल्या ल्युएण्डा हे शहर जगातील सर्वात महाग शहर ठरले आहे. हे शहर सर्वेक्षणात प्रथम स्थानावर आहे.

भारताचा विचार केल्यास पर्यटकांसाठी मुंबई सर्वात खर्चीक ठरत आहे. या सर्वेक्षणात नवी दिल्ली ९९व्या स्थानावर आहे. तर चेन्नई (१३५), बेंगळूरु (१६६), कोलकाता (१८४) या शहरांचाही समावेश आहे. मुंबईने या क्रमवारीत ऑकलँड (६१), पॅरिस (६२), कॅनबेरा (७१), सीटल (७६) आणि व्हिएना (७८) या शहरांना मागे टाकले आहे.

मुंबईमध्ये जेवण आणि हॉटेलचा खर्च सर्वाधिक आहे. चीज, बटर, मासे, मटण यांच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. जगभरातील पर्यटकांची याच खाद्यपदार्थाना अधिक पसंती मिळते. याशिवाय कांदे, टोमॅटो, अननस यांसारख्या फळे आणि भाज्यांच्या किमतीमध्येही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. वाहतुकीचा खर्चही मुंबईत अधिक दिसून आला आहे. टॅक्सी आणि रिक्षाचे भाडेही मोठय़ा प्रमाणात वाढले आहे.

टय़ुनिस (२०९), बिशकेक (२०८), कोपजे (२०६), ब्लाटायर (२०५), बिलीसी (२०४), मॉन्टेरेरी (२०३), सॅराजेवो (२०२), कराची (२०१) आणि मिन्स्क (२००) ही जगातील सर्वात स्वस्त शहरे आहेत असे या सर्वेक्षणात नमूद केले आहे. लुएन्डा या शहरानंतर हाँगकाँग (२), टोकियो (३), झ्युरिच (४), सिंगापूर (५) ही  जगभरातील महागडी शहरे आहेत. याशिवाय सेऊल, जिनेव्हा, शांघाय, न्यूयार्क, बर्न या शहरांचा क्रमवारीत पहिल्या १० मध्ये समावेश आहे. या यादीमध्ये युरोप खंडातील शहरांचा पहिल्या दहामध्ये समावेश आहे.

या सर्वेक्षणाविषयी अधिक माहिती देताना मर्सरच्या भारतातील प्रमुख रुचिका पाल यांनी सांगितले की, २०१६ साली जाहीर झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे घरांच्या किमती मोठय़ा प्रमाणात वाढल्या तर भाडय़ाने घर घेऊन तात्पुरती सोय करणाऱ्यांची संख्या वाढली. यामुळे या किमतीमध्येही आपसूकच वाढ झाली, असे रुचिका पाल यांनी सांगितले.

untitled-12