देशाच्या आर्थिक राजधानीत जागेला सोन्याचा भाव येत असल्याचे सर्वदूर चर्चिले जात असतानाच चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत येथील घरांच्या किंमतीत अवघी २ टक्के वाढ नोंदली गेल्याचे समोर आले आहे.
मालमत्तांचा पुरवठा, तसेच शहरातील विविध परिसरांतील सरासरी भांडवल वाढ/घट यांचा वेध घेणाऱ्या शहर निर्देशांकात ३ टक्के वाढ नोंदली गेल्याचे स्पष्ट करतानाच किंमतीत २ टक्के वाढ झाल्याचे ‘मॅजिकब्रिक्स’ने म्हटले आहे.

निर्देशांकातील हे मोजमाप त्या परिसरातील ‘प्रति चौरस फूट सरासरी दरा’तील हालचालींनुसार केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मुंबई परिसरांमध्ये पश्चिम द्रुतगती मार्गालगतच्या काही परिसरांमध्ये भांडवल मूल्यामध्ये वाढ आढळून आली. ‘मॅजिकब्रित्स प्रॉपइंडेक्स’ हे मालमत्तेच्या शोधातील तसेच गुंतवणूकदारांना निवासी घरांच्या किमतीतील चढ-उतारांबाबत आणि भारतातील मालमत्तांच्या पुरवठय़ाबाबत तपशीलवार माहिती देणारे दिशादर्शक आहे. पहिल्या तिमाहीत शहरात निर्देशांक मूल्य वाढीबरोबरच निवारा पुरवठय़ातही वाढ झाल्याचे याबाबतच्या सर्वेक्षणात आढळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र ग्राहकांची घर खरेदी इच्छाशक्ती ७ टक्क्य़ांनी घसरली आहे. शहरात निवाऱ्याकरिता अधिक पुरवठा असला तरी वाढत्या किमतींमुळे ग्राहक घरे घेण्याचे टाळत असल्याचे यातून दिसून आले.

स्मार्ट सिटी व सरकारच्या अन्य निर्णयांमुळे शहरांच्या पुनर्वकिासासाठी मोठा पसा खर्च केला जात असल्याची भावना खरेदीदारांना आकर्षित होते, असेही समोर आले आहे. यामुळे सकारात्मक बदल अमलात आणलेल्या सर्व परिसरांतील मूल्यावर भविष्यातही परिणाम होऊ शकतो, असेही हे सर्वेक्षण अधोरेखित करते.
माफक दर श्रेणीतील मूल्यवाढीबरोबरच, उपनगरात व शहराच्या मुख्य भागात पर्यायांची उपलब्धताही वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे.