कालच्या मोठय़ा घसरणीतून शेअर बाजार आज सप्ताहअखेरच्या दिवशी काहीसा सावरला. ‘सेन्सेक्स’मध्ये शुक्रवारी किरकोळ, ८ अंशांची घसरण नोंदली गेली. तर ‘निफ्टी’ही २ अंश घसरणीने बंद झाला. दोन्ही प्रमुख भांडवली बाजार अनुक्रमे १९,३१७.०१ व ५,८५०.३० पर्यंत आले.
सप्ताहाच्या अखेरच्या दिवसाचे व्यवहार सुरू झाले तेव्हाही शेअर बाजारात सकाळच्या सत्रात २५ अंशांची घसरणच होती. यामुळे कालच्या ३१७ अंश घसरणीनंतर ‘सेन्सेक्स’ १९,३०० च्याही खाली आला. तर ‘निफ्टी’तही याप्रसंगी १४ अंशांची घट नोंदली जात होती. तेव्हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक ५,८३७ वर होता. मुंबई निर्देशांक १९,४०१.७५ ते १९,२८९.८३ दरम्यान प्रवास करत होता. यामुळे बाजार २०१३ च्या नीचांक पातळीवर कायम आहे.
येत्या आठवडय़ात जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत गुंतवणूकदारांमध्ये अद्यापही धास्ती कायम आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात करांचा बडगा मोठय़ा प्रमाणात उगारल्या जाण्याच्या भीतीने स्थानिक गुंतवणूकदारांसह विदेशी संस्थागत गुंतवणूकदारही भांडवली बाजारातील रक्कम रिती करत आहेत. गुरुवारी होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे गुंतवणूकदार कसे पाहतात हे सोमवारपासूनचे भांवडली बाजारातील व्यवहार दाखवून देतील.  दरम्यान, विदेशी चलन व्यवहारात रुपया आज वधारला. कालच्या तुलनेत डॉलरपेक्षा ३० पैशांनी वधारत रुपया शुक्रवारी ५४.१८ वर पोहोचला. गेल्या काही सत्रांमध्ये स्थानिक चलनाने चांगलीच आपटी खाल्ली होती.

मुंबई शेअर बाजारातील तेजीचे प्रतीक असणाऱ्या ‘बुल’ला त्याचे ‘लक्ष्य’ दाखविण्याचा तर प्रयत्न सचिन पाटील करत नसावेत ना! केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्री ‘बीएसई’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांच्यासह.

व्होडाफोनबाबतचा असो किंवा गार संदर्भातील कर असे सारे प्रस्तावित, वादग्रस्त करांच्या रचनेवर सध्या विचारविमर्श सुरू आहे. त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी करायची हे यानंतरच स्पष्ट होईल.
– पी. चिदम्बरम
केंद्रीय अर्थमंत्री