भांडवली बाजारातील तेजी पाहता समभाग संलग्न योजनांमधील वाढत्या गुंतवणुकीने देशातील म्युच्युअल फंड गंगाजळीने १२ लाख कोटी रुपयांचे शिखर गाठले. चालू वर्षांच्या एप्रिल ते जून तिमाहीत ३९,००० कोटी रुपयांच्या नवीन ओघामुळे  फंडातील मालमत्ता जून २०१५ अखेर १२.२७ लाख कोटी रुपयांवर गेली आहे.
२०१४-१५ या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत फंडांची मालमत्ता ११.८८ लाख कोटी रुपये होती. ती २०१५-१६ या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत १२.२७ लाख कोटी रुपये झाली आहे. तिमाहीत त्यात ३ टक्के भर पडली आहे.
विविध ४४ फंड कंपन्या अनेक गुंतवणूक योजनेद्वारे निधीचे व्यवस्थापन पाहतात. यामध्ये गेल्या तिमाहीत १.६५ लाख कोटी रुपयांसह एचडीएफसी आघाडीवर आहे, तर आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल ही १.५५ लाख कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिमाहीत दोन्ही कंपन्यांच्या मालमत्तेत झालेली वाढ अनुक्रमे २.१ व ४.७ टक्के आहे.e03एक लाख कोटी रुपयांहून अधिकच्या मालमत्तेत याचबरोबर रिलायन्स, बिर्ला सनलाइफ यांचाही क्रम आहे, तर ९२,७३० कोटी रुपयांसह यूटीआय म्युच्युअल फंड कंपनी पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र कंपनीने या तिमाहीत २१ टक्के घसरण राखली आहे. आघाडीच्या एकूण पाच कंपन्यांची वाढ ही ३.५८ टक्के आहे.
१९ फंड कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत घसरणीचा फंड गुंतवणूक प्रवास नोंदविला आहे.
कोटक महिंद्र म्युच्युअल फंड कंपनीने तिमाहीत १६.२ टक्के भर नोंदविताना ६,६९८.७० कोटी रुपयांच्या वाढीसह ४८,०७६.५८ कोटी रुपयांची मालमत्ता जमविली आहे. १९९८ मध्ये व्यवसाय शिरलेल्या कंपनीचे ७ लाख गुंतवणूकदार आहेत.
एप्रिल ते जून या एकूण तिमाहीत सेन्सेक्स व निफ्टीचा प्रवास उणे राहिला असला तरी मे महिन्यात बाजार एका उंची टप्प्यावर होता. तसेच तिमाहीच्या शेवटच्या महिन्यातील त्याची घसरण ही एक टक्क्य़ापेक्षाही कमी होती.े