कोटय़वधी रुपयांच्या फंडांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या संघटनीकृत देशव्यापी व्यासपीठाची मुख्य धुरा पुन्हा एकदा बँक क्षेत्रातील व्यक्तीकडेच दिली गेली आहे. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया’ अर्थात ‘अ‍ॅम्फी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सार्वजनिक आंध्रा बँकेचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सी. व्ही. आर. राजेंद्रन हे नियुक्त झाले आहेत.
या पदावरील व बँक व्यवस्थापन संघटना ‘इंडियन बँक्स असोसिएशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले एच. एस. सिनोर हे सप्टेंबरअखेरिस निवृत्त होत आहेत.
ए. पी. कुरियन यांच्याकडून सिनोर यांनी २०१० मध्ये अ‍ॅम्फीची सूत्रे हाती घेतली होती.
सिनोर स्वत: आयसीआयसीआय बँकेचे वरिष्ठ अधिकारी राहिले आहेत. त्यांच्या नव्या वारसदारासाठी मेपासून नेमलेल्या त्रिसदस्यीस समितीने अखेर राजेंद्रन यांच्या नावावर शिक्कोमोर्तब केले.
राजेंद्रन हे २०१३ मध्ये आंध्रा बँकेत रुजू झाले. तत्पूर्वी ते बँक ऑफ इंडिया आणि कॉर्पोरेशन बँकेतही होते.