‘आयसीआयसीआय-प्रु’ची व्हायडलशी सामंजस्यातून गुंतवणूकदारांना सुविधा
आघाडीचे म्युच्युअल फंड घराणे असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने व्हायडल हेल्थकेअर सव्‍‌र्हिसेस या कंपनीशी अनोखे सामंजस्य केले असून, गुंतवणूकदारांना आरोग्य निगा सुविधा प्रदान केले आहे. कंपनीच्या सेव्हिंग्ज फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मेडिक्लेमप्रमाणे ‘कॅशलेस’ सुविधा या सामंजस्यातून उपलब्ध होणार आहे.
व्हायडल हेल्थकेअरशी संलग्नता असलेल्या देशभरातील ८०० शहरातील सुमारे ६,००० रुग्णालये आणि १,५०० हून अधिक निदान केंद्रे व चिकित्सालयांसाठी येणारा वैद्यकीय खर्च हा गुंतवणूकदार आयसीआयसीआय-प्रुडेन्शियलच्या म्युच्युअल फंडाच्या सेव्हिंग्ज योजनांमध्ये गुंतवणूक करून भागवू शकतील. गुंतवणूकदाराचा आरोग्य विमा असला अथवा नसला तरी ही सुविधा पुरविली जाईल, असे कंपनीने प्रसिद्धीपत्रकान्वये स्पष्ट केले आहे.
विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीत किमान जोखीम असलेले सेव्हिंग्ज फंड हा उत्तम पर्याय आहे, परंतु या फंडात पैसा गुंतवून कॅशलेस आरोग्य विम्याचे लाभ आणि दीर्घावधीत भांडवली वृद्धी देणारी ही योजना ही गुंतवणूकदारांच्या दृष्टीने खूपच उपकारक असल्याचा दावा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी निमेश शाह यांनी केला.
अलीकडे काही मोजक्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी त्यांच्या दीर्घ मुदतीच्या ‘एसआयपी’ गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या बदल्यात मुदतीच्या विम्याचे (टर्म इन्श्युरन्स) संरक्षण प्रदान करणाऱ्या सुविधाही सुरू केल्या आहेत.