नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत २५ टक्के निर्देशांक झेप कामगिरी बजाविणाऱ्या भांडवली बाजाराच्या जोरावर मुच्युअल फंडांची मालमत्ता व विदेशी गुंतवणूकदारांचा ओघ इतिहासात प्रथमच विक्रमी टप्प्यावर गेला आहे. म्युच्युअल फंड उद्योगाने जवळपास १२ लाख कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन हाताळले आहे. तर विदेशी संस्था गुंतवणूकदारांनी बाजारात २.७३ लाख कोटी रुपये बाजारात ओतले आहेत.
विदेशी गुंतवणुकीचा ओघ २.७३ लाख कोटींवर
ल्ल भांडवली बाजारातील विदेशी संस्था गुंतवणूकदारांचा निधीही गेल्या आर्थिक वर्षांत विक्रमी टप्प्यावर पोहोचला आहे. ३१ मार्च २०१४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत या गुंतवणूकदारांनी २.७३ लाख कोटी रुपयांचा निधी बाजारात ओतला आहे.
नोव्हेंबर १९९२ मध्ये विदेशी संस्था गुंतवणूकदारांना भारतीय भांडवली बाजारातील प्रवेश खुला झाल्यानंतरची यापूर्वीची सर्वाधिक रक्कम २०१२-१३ मध्ये १.६८ लाख कोटी रुपये नोंदली गेली आहे. भांडवली बाजारातील समभागांमध्ये विदेशी संस्था गुंतवणूकदारांनी १.०९ लाख कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. तर १.६४ लाख कोटी रुपये हे रोखे बाजारात त्यांच्यामार्फत गुंतविले गेले आहेत. २०१३-१४ मध्ये विदेशी संस्था गुंतवणूकदारांनी निव्वळ ८०,००० कोटी रुपये हे समभाग बाजारात गुंतविले होते. यंदा चौथ्यांदा विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी १ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

म्युच्युअल फंड मालमत्तेत ३ लाख कोटींची भर
*फेब्रुवारी २०१५ मध्येच १२ लाख कोटी रुपयांचा टप्पा प्रथम गाठणाऱ्या भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाने गेल्या एकूण आर्थिक वर्षांतही विक्रमी कामगिरी बजावली आहे. वार्षिक तुलनेत फंड मालमत्ता ३ लाख कोटी रुपयांनी उंचावली आहे.
देशातील प्रमुख ४४ फंड घराण्यांची मालमत्ता ३१ मार्च २०१५ अखेर ११.८८ लाख कोटी रुपये झाली असून वार्षिक तुलनेत ती ३१ टक्क्यांनी वाढली आहे. फंड कंपन्यांनी फेब्रुवारीमध्येच १२.०२ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला होता.
गेल्या आर्थिक वर्षांतील भांडवली बाजारातील तेजीच्या जोरावर फंड उद्योगातही वाढ नोंदली गेली असून २०११-१२ पासून फंड मालमत्ता ९.०५ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. गेल्या वर्षांत समभाग निगडित फंड योजनांमध्ये अधिक गुंतवणूक झाली आहे.
२०१४-१५ मध्ये सेन्सेक्स प्रथमच ३० हजारांवर गेला. तर फंड क्षेत्रातील एक लाख कोटी रुपयांच्या निधी व्यवस्थापनात बिर्ला सन लाइफने सहभाग नोंदविला. सध्या एचडीएफसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल व रिलायन्सही एक लाख कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन हाताळतात.
२०१४-१५ मध्ये भारतीय म्युच्युअल फंड क्षेत्रातून अनेक कंपन्यांनी काढता पाय घेतला. यामध्ये दायवा, आयएनजी (बिर्ला सन लाइफकडे), मॉर्गन स्टेनले, प्रॅमेरिका, फिडेलिटी (एल अ‍ॅन्ड टीमध्ये विलीन), पाइनब्रिज (कोटक म्युच्युअल फंडमध्ये सहभागी) यांचा समावेश होता.