भारत व अमेरिका यांच्या संबंधात वादग्रस्त ठरलेला एच १ बी व्हिसाचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत झालेल्या पहिल्याच बैठकीत चर्चेला आला नाही. खरेतर या प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता नाही असे ट्रम्प प्रशासनाने मोदी यांच्या  दौऱ्याआधीच सांगितले होते.

ट्रम्प प्रशासन एच १ बी व्हिसा मुद्दय़ावर फेरआढावा घेत असून, हा मुद्दा चर्चेत यावा अशी अपेक्षा भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना होती. एच १ बी व्हिसाचा गैरवापर होत असल्याने त्यात सुधारणा करण्याच्या अध्यादेशावर अध्यक्ष ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली होती, त्यामुळे माहिती तंत्रज्ञान उद्योगातील जे भारतीय कर्मचारी अमेरिकेत जातात त्यांना हा व्हिसा मिळण्यात अडचणी आहेत.

एच १ बी व्हिसाचा मुद्दा चर्चेत आला होता का असे विचारले असता परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी सांगितले, की उद्योगपती पातळीवर तसेच दोन्ही नेत्यांत डिजिटल भागीदारीबाबत चर्चा झाली आहे. भारतीय समुदायाने अमेरिकेशी संबंधात मोठी भूमिका पार पाडली आहे हे दोन्ही देशांना मान्य आहे, त्यामुळे या मुद्दय़ाचा विचार अमेरिका करील यात शंका नाही. भारत-अमेरिका संयुक्त निवेदनातही एच १ बी व्हिसा मुद्दय़ाचा उल्लेख नव्हता.

‘व्हाइट हाऊस’कडून प्रसृत माहितीनुसार अमेरिकानिवासी भारतीय लोक सिलिकॉन व्हॅलीतील तंत्रज्ञान क्रांतीत आघाडीवर असून, तेथील १५ टक्के नवोद्योग (स्टार्टअप) उपक्रम हे भारतीय अमेरिकी लोकांचे आहेत. त्यांनी पेंटियम चिप, फायबर ऑप्टिक्स, आवाजरहित हेडफोन यांसारख्या नवशोधात मोठी भूमिका पार पाडली आहे.

आकडे काय सांगतात..?

भारतातील अमेरिकी नागरिक             ७ लाख

अमेरिकेतील भारतीय नागरिक            ४० लाख

भारतीय नागरिकांना व्हिसा             १० लाख

भारतीय नागरिकांच्या अमेरिका वारी        १७ लाख