देशभरातील आरोग्यनिगा क्षेत्रात झपाटय़ाने होत असलेल्या बदलात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींच्या गौरवासाठी ‘मेडस्केप इंडिया’तर्फे पुढाकार घेण्यात आला असून, यंदाचे हे पुरस्कारांचे दुसरे वर्ष आहे. गतवर्षी केवळ महाराष्ट्रापुरते सीमित असलेले हे पुरस्कार यंदा राष्ट्रीय स्तरावर देण्याची योजना आहे. दोन गटात विविध वर्गवारीतील या पुरस्कारासंबंधीचा संपूर्ण तपशील मेडस्केप इंडियाचे वेबस्थळ http://www.msiawards.com  वर उपलब्ध आहे. याच वेबस्थळावर पुरस्कारासाठी ऑनलाइन नामांकने दाखल करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. ऑनलाइन नामांकने येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत दाखल करता येणार आहेत.
पहिल्या ‘मराठी उद्योग भूषण’ पुरस्काराने तिघांचा सन्मान
मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाने  यशस्वीपणे आयोजित केलेल्या ‘लक्ष्य २०२०’ या दोन दिवसांच्या उद्योजक परिषदेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मराठी उद्योगविश्वात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तीन उद्योजकांना ‘मराठी उद्योग भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. रिचा रिअ‍ॅल्टर्सचे अध्यक्ष प्रकाश जोशी (छायाचित्रात डावीकडे), शुश्रूषा रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर लाड आणि म्हाडाचे अध्यक्ष प्रसाद लाड यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. परिषदेला राज्यभरातून २००० हून अधिक प्रतिनिधींना लावलेली उपस्थिती आणि उदंड प्रतिसाद पाहता, पुरस्कारही यापुढे दरसाल देण्याचे नियोजन असल्याचे मराठी व्यापारी मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष अनंत भालेकर यांनी सांगितले.