लांबणीवर टाकलेली सौदापूर्ती आणि गुंतवणूकदारांना जवळपास ६००० कोटी रुपयांची रोख अदायगी थकलेल्या ‘नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि. – एनएसईएल’ने आपल्या बाजारमंचावर उपलब्ध असलेल्या सोने-चांदी व अन्य धातूंच्या ई-मालिकेतील सौद्यांनाही आपणहून विराम देण्याची घोषणा मंगळवारी केली.
सरकारकडून बंदीची तलवार चालविली जाण्याआधीच या उरल्यासुरल्या सौद्यांना ‘एनएसईएल’ने अटकाव घालणे पसंत केले. ३१ जुलैपासून या बाजारमंचावरील अन्य सौद्यांना या आधीच स्थगिती दिली गेली असल्याने आता एनएसईएल सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.
शेअर बाजारातील रोखीतील व्यवहारांच्या धर्तीवर एनएसईएलकडून सोने, चांदी, तांबे, जस्त, पारा, निकेल आणि प्लॅटिनम या धातूंमध्ये अगदी अल्पतम (१ ग्रॅम) प्रमाणात आणि डिमॅट स्वरूपात खरेदी-विक्रीची सुविधा ई-मालिकेच्या सामान्य गुंतवणूकदारांना बहाल केली गेली.
या बाजारमंचावरील या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या ई-मालिकेमधून जून २०१३ची उलाढाल ही रु. १८,३१५ कोटी अशी असून, एनएसईएलच्या एकूण उलाढालीत तिचे ४० टक्के योगदान आहे.
केंद्रीय अन्न व ग्राहक मंत्रालयाकडून नियमबाबतच्या व्यवहारांना मुभा दिल्यामुळे चपराक बसलेल्या एनएसईएलवर सध्या सुरू असलेल्या ई-मालिकेतील व्यवहारांवरही बंदी आणली जाईल आणि लवकरच त्या संबंधाने अधिसूचना काढली जाईल, अशी वदंता होतीच.
सरकारकडून कारवाई बंदीची केली जाण्याआधीच, दक्षतेचा उपाय म्हणून मंगळवारी बाजार सत्राच्या प्रारंभीच सकाळी १० वाजता ई-मालिकेतील व्यवहार सुरू होणे नसल्याचे, एनएसईएलने आपल्या संकेतस्थळाद्वारे जाहीर केले.

दलाल, गुंतवणूक व्यवस्थापक रडारवर!
उच्च धनसंपदेच्या गुंतवणूकदारांना ‘पोर्टफोलियो मॅनेजमेंट सेवा’ प्रदान करणाऱ्या गुंतवणूक व्यवस्थापक आणि ‘एनएसईएल’वर सक्रिय शेअर दलालांवर भांडवली बाजाराची नियंत्रक ‘सेबी’ची करडी नजर आहे. निश्चित स्वरूपाचा १५ टक्के दराने परताव्याची हमी देऊन गुंतवणूकदारांना एनएसईएलच्या मंचावर पैसा लावण्याची दलालांकडून फूस लावण्यात आली, अशा तक्रारी ‘सेबी’ला तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचेही कळते. शेअर बाजारातील पडझडीमुळे घसरत असलेल्या परतावा पाहता, काही दलालांनी शेअर गुंतवणुकीसाठी मिळविलेला निधी परस्पर एनएसईएलवर सौद्यांसाठी वळविला असण्याच्या शक्यतेचीही ‘सेबी’ चाचपणी करीत आहे. या तपासातून पुढे येणारा सर्व तपशील हा ‘एनएसईएलच्या विचक्या’ची चौकशी करणाऱ्या फॉरवर्ड मार्केट्स कमिशन (एफएमसी), केंद्रीय अन्न व ग्राहक मंत्रालय तसेच अर्थमंत्रालयालाही उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही ‘सेबी’ने दिली आहे. एनएसईएलवर लांबणीवर टाकल्या गेलेल्या सौदापूर्तीची संभाव्य पडछाया शेअर बाजारातील व्यवहारांवर पडू नये म्हणून खबरदारी घेताना ‘सेबी’ने ही पावले टाकली असल्याचे स्पष्ट केले आहे.

समभागांची आपटी कायम
एकूण भांडवली बाजारातील रसातळात एफटीआयएलचे मूल्य अधिक मिसळत चालले आहे. नॅशनल स्पॉट एक्स्चेन्जच्या व्यासपीठावरून उर्वरित व्यवहारही ठप्प पडल्यानंतर प्रमुख प्रवर्तक कंपनीचा समभाग २० टक्क्यांनी आपटला. दोन सत्रात ७५ टक्क्यांहून अधिक घसरणारा समभाग कालच्या व्यवहारात काहीसा उंचावला होता. मंगळवारी मात्र ते १९.६० टक्क्यांनी घसरत १५९.१५ रुपयांवर येऊन ठेपला. दिवसभरातील त्याची आपटी २४.९८ टक्क्यांपर्यंतची होती. समूहातीलच एमसीएक्सच्या समभागात १० टक्क्यांपर्यंतची घट झाली. ३३१.८५ रुपये भाव मिळताना त्याने ‘लोअर सर्किट’पर्यंत थांबणे पसंत केले.