शालोपयोगी सामग्री व अभ्यास साहित्याच्या निर्मितीतील अग्रेसर नवनीत एज्युकेशन लि.चे प्रवर्तक गाला कुटुंबीयांनी शालेय गणवेशांची पुरवठादार स्कूलवेअर प्रायव्हेट लिमिटेड या नवोद्योगी कंपनीत भांडवली गुंतवणूक केल्याची घोषणा केली आहे.
२०१४ सालात स्थापन झालेल्या या कंपनीने केवळ मुंबईतील २०हून अधिक शाळांना गणवेशांचा पुरवठा केला आहे. ‘स्कूलवेअर डॉट इन’ या त्यांच्या ई-स्टोअरमार्फत आजवर ३०,००० हून अधिक ग्राहकांनी गणवेशांची खरेदी केली आहे.
आजघडीला देशात खासगी शाळांमधून शिकणारे तब्बल १० कोटी शालेय विद्यार्थी पाहता, शालेय गणवेशांची बाजारपेठ ३ अब्ज अमेरिकी डॉलरच्या घरात जाणारी असून, स्कूलवेअर डॉट इन ही या क्षेत्रातील महत्त्वाचा नवोद्योग असल्याचे मत नवनीत एज्युकेशनचे सुनील गाला यांनी व्यक्त केले. तथापि त्यांच्या गुंतवणूक रकमेचा तपशील मात्र त्यांनी दिलेला नाही. चालू वर्षांतील शैक्षणिक सत्राच्या प्रारंभापर्यंत स्कूलवेअरचे देशातील १५ शहरांतील ५००हून अधिक शाळांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. पँटोमॅथ अॅडव्हायजरी सव्र्हिसेसने या गुंतवणूकविषयक नवनीतची सल्लागार म्हणून काम पाहिले.