देशातील सहकारी बँकांच्या उन्नतीसाठी त्यांचे खासगीकरण करणे हा उपाय नसूल उलट या क्षेत्राच्या विधी व वित्तीय उन्नतीची गरज असल्याचे प्रतिपादन सहकार भारतीचे अध्यक्ष सतीश मराठे यांनी केले आहे. याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांना पत्र लिहून एकूणच देशाच्या सहकारी बँक क्षेत्रात लक्ष घालण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
गव्हर्नरांनी नुकतीच या क्षेत्राबाबत दाखविलेल्या कळकळीचे कौतुक करत मराठे यांनी राजन यांना लिहिलेल्या पत्रात एकूणच सहकारी, जिल्हा सहकारी व राज्य सहकारी बँकांकरिता विकासात्मक आराखडा सादर करण्याची आवश्यकता मांडली आहे. गेल्या काही वर्षांचे या क्षेत्राचे कार्य, अनुभव पाहता राज्य सहकारी बँका तसेच रिझव्‍‌र्ह बँक/नाबार्ड यांच्या सध्याच्या करार तरतुदींमध्ये बदल करण्याची शिफारसही याबाबतच्या पत्रात करण्यात आलीोहे.
काळानुरुप आवश्यक बदलानंतर सहकार क्षेत्राची भूमिका देशाच्या वित्तीय व बँक क्षेत्रात महत्त्वाची ठरू शकेल, असा विश्वासही याबाबतच्या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. सहकार भारती ही गेल्या ३५ वर्षांपासून सहकार क्षेत्रात कार्यरत आहे.