ऊर्जित पटेलांबाबत बँकप्रमुख, अर्थतज्ज्ञांना विश्वास; राजन यांची पतधोरण परंपरा कायम राखण्यावर ठाम

येत्या महिन्यात रघुराम राजन यांच्याकडून रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे घेणारे ऊर्जित पटेल हे व्याजदराबाबत राजन यांचीच धोरणे आखतील, असा ठाम विश्वास विविध बँकप्रमुख तसेच अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. देशाचा विकास दर सध्या संथ असला तरी वाढत्या महागाई दरापुढे व्याजदर कपातीच्या माध्यमातून नवे गव्हर्नर झुकणार नाही, असे ठाम मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

विद्यमान डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची रिझव्‍‌र्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून शनिवारी नियुक्ती जाहीर झाली. पटेल हे येत्या ५ सप्टेंबर रोजी गव्हर्नरपदाची सूत्रे मावळते गव्हर्नर राजन यांच्याकडून स्विकारतील.

पटेल यांनी राजन यांच्याबरोबर तीन वर्षे रिझव्‍‌र्ह बँकेत काम केले आहे. तत्पूर्वी चार वर्षांपासून ते रिझव्‍‌र्ह बँकेत आहे. राजन यांचे पतधोरण आखताना पटेल यांचे अर्थतज्ज्ञ म्हणून वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. पुढील दोन वर्षांसाठी ४ टक्के महागाई दर अपेक्षित करताना जानेवारी २०१४ मध्ये पटेल हे तयार करण्यात आलेल्या पतधोरण आराखडय़ाचे प्रमुख शिल्पकार होते.

सरकार व रिझव्‍‌र्ह बँकेनेही महागाई दराचे उद्दीष्ट ४ टक्क्य़ांचे राखले आहे. मात्र मध्यवर्ती बँकेसाठी आवश्यक असलेला किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर हा जुलैमध्ये ६ टक्क्य़ांवर गेला आहे.

वाढत्या विकासासाठी केवळ रिझव्‍‌र्ह बँकच सर्व काही करू शकेल, अशी सरकारची भावना असणे चुकीचे असल्याचे मत  सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एस. जयकुमार यांनी व्यक्त केले आहे. अंमलबजावणी प्रक्रियेद्वारे विधी पद्धती तसेच प्रकल्प प्रतिसाद सुधारणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

अर्थव्यवस्थेतील आव्हाने स्थिरावत असून मालमत्ता समस्येवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी प्रतिपादन केली आहे. सरकार स्तरावरून अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या योजना, प्रोत्साहनपूरक पावले यापूर्वीच उचलली गेल्याचेही त्या म्हणाल्या.

‘डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर’च्या ताज्या अहवालात, रिझव्‍‌र्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून ऊर्जित पटेल यांचे नाव जाहीर करून सरकारने पतधोरण तूर्त स्थिर ठेवण्याच्या बाजुनेच मतदान केल्याचे स्पष्ट होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पटेल यांच्या नेतृत्वाखालीदेखील मध्यवर्ती बँकेची व्याजदराबाबतची भूमिका कायम राहिल, असा विश्वास व्यक्त करतानाच सध्याची वाढती महागाई पाहता ते पुरते आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. महागाई दर ५ टक्क्य़ांच्या खाली आल्यास चालू आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत दर कपात होऊ शकते, असा विश्वासही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

कोटक महिंद्र असेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शाह यांच्या म्हणण्यानुसार, महागाईवर भर देणारे पतधोरण यापुढेही असेल, हेच पटेल यांच्या नियुक्तीवरून सूचित होते. यामार्फत भांडवली तसेच रोखे बाजारालाही दिलासा मिळू शकतो. अर्थव्यवस्थेचा आगामी प्रवास लक्षात घेऊन नव्या गव्हर्नरांकडून आवश्यकतेनुसार व्याजदराबाबतची पावले उचलली जातील.

पटेल यांच्या नियुक्तीबाबत, सॅम्को सिक्युरिटीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिमीत मोदी म्हणतात, भांडवली बाजाराच्या दृष्टीने फार अस्वस्थ हालचाल होईल, अशी ही नियुक्ती नाही. सध्याची पतविषयक धोरणे पटेल यांच्यामुळे बदलेल, असे फार वाटत नाही. राजन यांचीच धोरणे राबविणे हे बाजारासाठीही सकारात्मक पाऊल असेल.

मध्यवर्ती बँकेचे आगामी पतधोरण ४ ऑक्टोबर रोजी सादर होणार आहे. पटेल यांचे हे पहिले परिपूर्ण पतधोरण असेल.