थेरेसा मे यांच्या ‘ब्रेग्झिट’ भाष्यावरही लक्ष

निश्चलनीकरणापश्चात देशाच्या अर्थवृद्धीबाबत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांनी व्यक्त केलेल्या चिंतांमध्ये भर घालणारे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)च्या जीडीपीसंबंधाने नकारात्मक पूर्वानुमानाचे मंगळवारी बाजारात विपरीत सावट उमटले. परिणामी बँका, वित्तीय सेवा, धातू समभागांच्या गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीतून निफ्टीला तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण ८,४०० पातळी सांभाळणे अवघड बनले. निफ्टीने या पातळीखाली १४.८० अंशाच्या तुटीने ८.३९८ अंशांवर विश्राम घेतला. सेन्सेक्सनेही सोमवारच्या तुलनेत ५२.५१ अंश घसरणीसह २७,२३५.६६ अंशावर दिवसाचा निरोप घेतला.

भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी उशिराने होणाऱ्या ‘ब्रेग्झिट’विषयक ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या भाषणाकडेही लक्ष ठेवत बाजारात सावध व्यवहार होताना दिसले. मे यांच्या ब्रेग्झिट आराखडय़ाविषयी एकूणच जगभरातील भांडवली बाजारात मंगळवारी उत्सुकतेची स्थिती होती. परिणामी आशियाई बाजारातही सकाळी नरमाई आणि काहीशा संमिश्र स्वरूपाच्या दिसलेल्या हालचालींचेही स्थानिक बाजारात नकारार्थी परिणाम उमटले.

सकाळच्या सत्रात मात्र निर्देशांकांनी सोमवारच्या तुलनेत आपला तेजीपथ कायम राखल्याचे दिसले. विशेषत: मध्यान्हीला खुल्या झालेल्या युरोपीय बाजारांचा मूड पाहून निर्देशांकांची उलटय़ा दिशेने कलाटणी सुरू झाली. खरेदी-विक्रीच्या या उलटफेरीमुळे बीएसई आणि एनएसई दोन्ही बाजारपेठांच्या रोखीच्या व्यवहारांमध्ये कालच्या तुलनेत वाढ होऊन ते वाढलेले दिसले.

रुपयाला मात्र मजबुती

भांडवली बाजारातील विक्रीचा रुपयाच्या मूल्यावर मात्र परिणाम दिसला नाही. मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत १५ पैशांनी मजबूत बनला आणि ६८ खाली ६७.९५ रुपये असा आठवडय़ापूर्वी गमावलेली पातळी त्याने पुन्हा मिळविली. आंतरराष्ट्रीय स्तरावर कमजोर बनलेला डॉलर रुपयाच्या मूल्यवृद्धीच्या पथ्यावर पडला. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचा युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या जाहीर होणाऱ्या कार्यक्रमासंबंधाने डॉलर कमकुवत बनल्याचे दिसले.

नोटाबंदीनंतर ११ अब्ज डॉलरचे निर्गमन

नोटाबंदीच्या परिणामांबाबत नकारात्मक भावना बनलेल्या विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात गुंतविलेले तब्बल ११ अब्ज अमेरिकी डॉलर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत काढून घेतले आहेत. ‘सेबी’चे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी ही इतक्या प्रमाणात निर्गुतवणूक झाली असल्याचा कयास व्यक्त केला. मात्र नोटाबंदीचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम हे थोडय़ा कालावधीसाठी नकारात्मक असतील, असे  आपले मत असल्याचे त्यांनी लगोलग सांगितले.