जपानच्या निस्सान कंपनीची नवी डॅटसन गो+सात आसनी स्वरूपात सादर करण्यात आल्याने तिची स्पर्धा मारुती सुझुकीच्या इर्टिगा, शेव्हर्लेच्या एन्जॉयबरोबर होणार आहे. लांबीने चार मीटरच्या आतील हे नवे वाहन असले तरी ती ‘फॅमिली कार’ म्हणून पुढे आल्याने बहुपयोगी वाहन क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

निस्सानची नाममुद्रा असलेल्या डॅटसनचा गो+ हा नवा अवतार गुरुवारी मुंबई सादर करण्यात आला. हॅचबॅक श्रेणीतील या सात आसनी कारची किंमत ३.७९ ते ४.६१ लाख रुपये दरम्यान आहे. मुंबईत यावेळी निस्सान मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक अरुण मल्होत्रा, डॅटसनचे जागतिक प्रमुख विन्सेन्ट गोबे व निस्सानच्या भारतातील व्यवसाय विभागाचे अध्यक्ष गुलेलुम सिकार्ड आदी उपस्थित होते.
१.२ पेट्रोल इंजिन असलेली नवी डॅटसन गो+ प्रति लिटर २०.६ किलो मीटर धावेल. कार सादरीकरणापूर्वीच नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत १,००० जणांनी त्याबाबत उत्सुकता दाखविली आहे. डॅटसन श्रेणीतील पहिली कार गेल्या वर्षांच्या सुरुवातीला भारतीय प्रवासी वाहन बाजारपेठेत दाखल झाली. आतापर्यंत अशा १२ हजार डॅटसन कार विकल्या गेल्या आहेत.
डॅटसन ही निस्सानची वाहन क्षेत्रातील दुसरी नाममुद्रा असून अन्य इन्फिनिटी कंपनीद्वारे वाहन दालनांच्या साखळी चालविली जाते. तब्बल तीन दशकानंतर गेल्या वर्षी डॅटसन ही नाममुद्रा निस्साने पुन्हा नव्या स्वरूपात सादर केली. कंपनी याअंतर्गत तिच्या वाहनांची विक्री भारतासह इंडोनेशिया, रशिया तसेच दक्षिण आफ्रिका देशांमध्येही करणार आहे.