त्वचेचे सौंदर्य व निगेच्या उत्पादनांच्या निर्मितीतील आघाडीची आंतरराष्ट्रीय कंपनी निव्हियानेही तिच्या नव्या प्रकल्पासाठी गुजरातमधील साणंद शहराची निवड केली आहे. देशातील तिच्या पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन मंगळवारी झाले.

गेल्या सुमारे १३० वर्षांपासून त्वचा निगा बाजारपेठेत अव्वल स्थान राखणाऱ्या निव्हियाची आतापर्यंत भारतीय उपकंपनीमार्फत येथे उत्पादन उपलब्धताच होती. साणंद प्रकल्पाच्या माध्यमातून कंपनीचे आता प्रत्यक्षात उत्पादनही येथे होऊ लागले आहे.
शहरातील औद्योगिक वसाहतीतील या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ जून २०१४ मध्ये पार पडला होता. त्यानंतर आता प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन त्यातून उत्पादन निर्मिती सुरू झाली आहे, असे या वेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रक्षित हरगवे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला प्रतिसाद देण्याचाच हा प्रयत्न असल्याचेही हरगवे यांनी सांगितले. यामुळे भारतातील ग्राहकांना निव्हियाची तेवढय़ाच गुणवत्तेची उत्पादने मिळू शकतील, असेही ते म्हणाले.
७२ हजार चौरस मीटरवरील या प्रकल्पासाठी ८५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून त्याची वार्षिक उत्पादन निर्मिती क्षमता १० कोटी उत्पादने आहेत. कंपनी क्रीम तसेच लोशन या प्रकल्पातून तयार करणार आहे. येत्या तीन ते चार वर्षांत या प्रकल्पाचाही विस्तार करण्यात येणार आहे. याच परिसरात कंपनीचे संशोधन व विकास केंद्रही असेल. साणंदमध्ये यापूर्वीच टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, जनरल मोटर्स या कंपन्यांनी रस दाखविला आहे.