अनेकानेक विश्लेषकांच्या अनुमानांवर विसंबून तुम्ही जर आगामी दोन वर्षांत शेअर बाजारात प्रचंड तेजीची आस लावून बसला असाल तर थोडे सबुरीने घ्या, असे बजावणाराही एक कल आहे. ग्रहताऱ्यांच्या आधारे शेअर बाजारविषयक पूर्वानुमान करणारे सॉफ्टवेअर प्रस्तुत झाले असून, पुढील दोन वर्षे बाजाराला अच्छे दिन दिसण्यासाठी ग्रहांची साथ नसल्याचे त्याचे विश्लेषणाअंती अनुमान आहे.
भांडवली बाजार, रुपयाचा विनिमय दर, सोने-चांदीची चमक, हवामान वगैरे पैसा गुंतवणूकविषयक कल ज्योतिषाच्या माध्यमातून पडताळणाऱ्यांची एक दिवसाची परिषद रविवारी मुंबईत हॉटेल सहारा स्टार येथे योजण्यात आली. ‘ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अ‍ॅस्ट्रोलॉजर्स सोसायटी’द्वारे आयोजित या परिषदेत या अभिनव सॉफ्टवेअरचे अनावरण करण्यात आले. परिषदेचे आयोजक जयंत पांडे यांच्या मते, ग्रहताऱ्यांच्या दशेवर आधारित हे बाजार भाकितांची विश्वासार्हता ८० टक्के इतकी आहे. देश-विदेशातून ४०० हून अधिक प्रतिनिधीं परिषदेला उपस्थित होते.