विलीनीकरणापश्चात आयएनजी वैश्य बँकेतील विद्यमान कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड चालविली जाणार नाही, अशी ग्वाही कोटक महिंद्र बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष उदय कोटक यांनी शुक्रवारी येथे दिली.
आयएनजी वैश्य बँकेचे समभाग सुमारे १५,००० कोटी रुपयांच्या मोबदल्यात खरेदी करण्याचा निर्णय कोटक यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा मुंबईत जाहीर केला होता. आयएनजी वैश्य बँकेच्या संपादनामुळे कर्मचारी संख्या वाढणार असली तरी कपातीऐवजी भविष्यात त्यात आणखी भर घातली जाईल, असेही कोटक यांनी स्पष्ट केले.
उभय बँकांचे व्यावसायिक एकत्रीकरण होत असून, मनुष्यबळ अथवा शाखांमध्ये तूर्त आमूलाग्र बदल केला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. कर्मचारी कपात हा आयएनजी वैश्य बँकेच्या विलीनीकरणाचा मुख्य हेतू नसल्याचे याच बँकेचे    उपमुख्य कार्यकारी उदय सरीन यांनीही म्हटले आहे.
कोटक महिंद्र बँकेत २९ हजार, तर आएनजी वैश्य बँकेत १० हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठे विलीनीकरण म्हणून संबोधले जाणाऱ्या या घडामोडींमुळे कोटक महिंद्र ही देशातील चौथी मोठी खासगी बँक बनली आहे.  e08