रिझव्‍‌र्ह बँकेने धोरण स्थितरतेमुळे कर्जाचे व्याजदर कमी होणार नाहीत, ठेवींवरही ग्राहकांना आकर्षक व्याजदर मिळण्याची शक्यताही दुरावली आहे.
युनायटेड बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक दीपक नारंग यांनी सांगितले की, वाढत्या अनुत्पादक मालमत्तेपोटी बँकांना होणाऱ्या नफ्याचे प्रमाण सध्या कमी आहे तेव्हा सध्या ठेवींवर अधिक व्याज देण्याचा प्रश्नच येत नाही. फेडरल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम श्रीनिवासन यांनी मंगळवारचे पतधोरण अपेक्षेनुसारच असल्याचे म्हटले आहे.
देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनीही सध्या व्याजदर कमी होण्याची शक्यता कमीच असल्याचे मत व्यक्त केले; तर तूर्त व्याजदर स्थिर व पुढील वर्षांत ते कमी करण्याची रिझव्‍‌र्ह बँकेची भूमिका स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी दिली आहे.
येस बँक या खासगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांनी म्हटले आहे की, सद्य:स्थितीत बँकांना त्यांचे आधार दर बदलता येणार नाहीत. रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरणात व्याजदरात काही बदल केले तरच बँकांना निर्णय घेता येतो, असे त्यांनी सांगितले. मोठय़ा कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर मात्र बँका बदलू शकतात, असेही ते म्हणाले.
नेमकी व्याजदर कपात कधी करणार हे रिझव्‍‌र्ह बँकेने यंदा स्पष्ट केले नसले तरी त्याबाबत दाखविण्यात आलेली तयारी निश्चितच अभिनंदनास पात्र आहे, असे कोटक म्युच्युअल फंडच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी लक्ष्मी अय्यर यांनी म्हटले आहे. डिसेंबर मध्याला जाहीर होणाऱ्या ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईची कदाचित मध्यवर्ती बँकेला प्रतीक्षा असावी, असा अंदाज वर्तवीत अय्यर यांनी स्थिर पतधोरणाचे स्वागत केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून व्याजदरात कोणताही बदल न करण्यात आलेल्या स्थितीमुळे संयम राखलेल्या उद्योग क्षेत्राला वाढत्या खर्चातून दिलासा मिळण्याची प्रतीक्षा होती, असे मत व्यक्त करत पुढील वर्षांत व्याजदराबाबत चित्र बदललेले दिसेल, अशी अपेक्षा मुत्थूट फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक अलेक्झांडर मुत्थूट यांनी केली आहे.
व्याजदर कपातीबाबत चालू वर्षांत अपेक्षाभंग झाला; मात्र महागाईवर नियंत्रण राखण्याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेचा निग्रह कौतुकास्पद आहे, असे मत श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक उमेश रेवणकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, २०१५ मात्र कमी व्याजदराचे वर्ष असेल आणि ते कंपनी, उद्योग क्षेत्राची स्थिती उंचावणारे असेल,