देशाबाहेर पळालेल्या कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्याकडून वसुलीचा बँकांचा आणखी प्रयत्न बुधवारी अपयशी ठरला. मल्याकडून बडय़ा हस्ती व वलयांकित मंडळींना शानदार पाटर्य़ा दिल्या जात असे त्या किंगफिशर व्हिला या गोव्यातील आलिशान बंगल्यासाठी योजण्यात आलेला ई-लिलाव एकही बोली आकर्षित करू शकला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मल्याकडून कर्जवसुलीसाठी किंगफिशर एअरलाइन्स या कंपनीच्या अनेक मालमत्तांच्या लिलावाचे धनको बँकांचे प्रयत्न वारंवार फसल्याचे या आधीही आढळून आले आहे. या १२,३५० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या ख्यातकीर्त बंगल्यासाठीही ८५.३ कोटी रुपये या राखीव किमतीवर बोली मागविण्यात आल्या होत्या. प्रत्यक्ष लिलाव आणि किमतीची घोषणा होण्यापूर्वी सप्टेंबरमध्ये हॉटेल उद्योग तसेच माध्यम उद्योगातील अर्धा डझन कंपन्यांनी या बंगल्याची पाहणी करून खरेदीत स्वारस्य दाखविले होते.

तथापि त्यांनी लिलावात प्रत्यक्ष सहभागी न होण्यामागे राखीव किंमत जास्त ठेवली गेल्याचे कारण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वात मल्यांना कर्ज देणाऱ्या १७ धनको बँकांच्या समुच्चयाकडे या बंगल्याचा सध्या ताबा आहे. बँकांचे ९,००० कोटींचे कर्ज थकविले गेले आहे.