मूळची फिनिश कंपनी नोकियाच्या जगातील सर्वात मोठा निर्मिती प्रकल्प शनिवारपासून अखेर बंद होत आहे. नोकियाचा चेन्नई येथील प्रकल्पातील मोबाइल हॅण्डसेट निर्मिती यापूर्वी ठप्प पडली आहे.
नोकियाने आपला संपूर्ण व्यवसाय मायक्रोसॉफ्टला ७.२ अब्ज डॉलरना विकण्याचा सप्टेंबर २०१३ मध्ये घेतलेल्या निर्णयाची पूर्तता कंपनीने मार्च २०१४ अखेर केली. मात्र २,४०० कोटी रुपयांच्या करतिढय़ावरून तमिळनाडू राज्यातील या प्रकल्पाचा विलीनीकरणाचा समावेश करण्यात आला नव्हता. प्रकल्प मायक्रोसॉफ्टला हस्तांतर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नोकियाकडे  ३,५०० कोटी रुपयांची हमी मागितली होती. अखेर हा प्रकल्पच बंद करण्याचे पाऊल नोकियामार्फत उचलण्यात आले. येथील साहित्य सामग्री व्हिएतनाममध्ये हलविण्यात आली आहे. तर ८,४०० पैकी ५,७०० कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली आहे.