ई-कॉमर्समधील वेगवान स्पर्धा प्रवर्तकांच्या हमरीतुमरीवर येऊन पोहोचली आहे. व्यवसायाकरिता तज्ज्ञ अभियंते न मिळण्यासाठी भारतालाच दोष देणे बरोबर नाही, अशा शब्दात फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी स्नॅपडीलचे सहसंस्थापक रोहित बन्सल यांच्याविरुद्ध आघाडी घेतली आहे. ट्विटर या सोशल नेटवर्किंग व्यासपीठावरून ही शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.
व्यवसायासाठी भारतात तज्ज्ञ अभियंत्यांची कमतरता असल्याचे भाष्य स्नॅपडीलच्या रोहित बन्सल यांनी केले होते. याबाबत फ्लिपकार्टचे सचिन बन्सल यांनी रोहित बन्सल यांचे नाव न घेता नव्याने ट्विट करत यासाठी भारताला जबाबदार धरणे चुकीचे असल्याचा प्रहार केला. इथले वातावरण पाहता उत्पादन घेणाऱ्या अनेक कंपन्या या येथे उभ्या राहिल्या नाहीत; तेव्हा त्यासाठीच्या एखाद्या अपयशासाठी समस्त देशालाच वेठीस धरणे चुकीचे आहे, असे सचिन यांनी म्हटले आहे. इथल्या कंपन्यांमध्ये अभियंते रुजू होत आहेत ते येथील संस्कृती व आव्हाने लक्षात घेऊनच, असेही त्यांनी ट्विट केले. ई-कॉमर्स बाजारपेठेत तीव्र स्पर्धा अनुभवणाऱ्या बन्सल व्यावसायिकांमधील व्यवसायानुभवही विरुद्ध टोकाला पोहोचले आहेत. उभयतांमध्ये असे दुसऱ्यांदा घडत आहे. ‘एअरटेल झिरो’वरून उठलेल्या ‘नेट न्युट्रॅलिटी’ वादातही बन्सल व्यावसायिक एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. तसेच ई-कॉमर्स व्यावसायिकांमध्येही असे पहिल्यांदाच घडत नाही.
गेल्या आठवडय़ात हाऊसिंग.कॉमचे चर्चेतील मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल यादव व झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंदर गोयल यांच्यातील वादही ट्विटरवर अवतरला होता. कंपनीतील कर्मचाऱ्यांना समभागांच्या रूपात आपल्यातील हिस्सा देण्यावरून उभयतांमध्ये मत-मतांतरे होती.
ई-कॉमर्स बाजारपेठेत तीव्र स्पर्धा अनुभवणाऱ्या बन्सल व्यावसायिकांमधील व्यवसायानुभवही विरुद्ध टोकाला पोहोचले आहेत. उभयतांमध्ये असे दुसऱ्यांदा घडत आहे. ‘एअरटेल झिरो’वरून उठलेल्या ‘नेट न्युट्रॅलिटी’ वादातही बन्सल व्यावसायिक एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते.