सेवानिवृत्ती निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने बुधवारी फोनवर आधारित भविष्य निर्वाह निधी खात्याशी निगडित तीन सेवा सुरू केल्या. या सुविधेचा लाभ ३.५४ कोटी पीएफधारकांना होणार आहे.
केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन हैदराबाद येथे झाले. निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या २०८ व्या बैठकीत या सेवा सुरू करण्यात आल्या. या तीन सेवांचा लाभ संघटनेचे ३.५४ कोटी खातेधारक आणि ४९.२२ लाख निवृत्तीधारक तसेच ६.१ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. पैकी वैश्विक खाते क्रमांक असणाऱ्यांची संख्या १.८० कोटी तर ५८.७२ लाख वैश्विक खाते क्रमांकधारक हे आधारशी व १.८२ धारक बँक खात्यांशी संलग्न आहेत.

नवीन सुविधा काय?
७७३८२९९८९९ वर एसएमएस पाठविल्यानंतर खातेदारांचे खाते फोनशी संलग्नता कार्यान्वित होईल.
०११-२२९०१४०६ वर मिस कॉल दिल्यानंतर खातेदाराला आवश्यक ती माहिती पुरविली जाईल.

काय करावे लागेल?
या मोबाइलवर आधारीत सुविधेमध्ये, एसएमएसवर आधारित वैश्विक खाते क्रमांक (यूएएन) सुरू करणे तसेच मिस कॉल सेवा यांचा त्यात समावेश आहे. यासाठी संघटनेच्या संकेतस्थळावरून नवे मोबाइल अॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधितांना त्यांच्या मोबाइलवरून यूएएन खाते सुरू करता येईल. यामुळे खातेदार त्यांचे मासिक व्यवहार पाहू शकतील. यामध्ये जमा होणारी रक्कम वगैरेंचा समावेश आहे.