चलनाचे वायदा व्यवहारासंबंधाने देशातील अग्रणी भांडवली बाजार अर्थात राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई)ने आपल्या प्रभुत्व स्थानाचा अनुचित वापर केल्याचा भारतीय स्पर्धा आयोगाने तीन वर्षांपूर्वी दिलेल्या निकालाची मंगळवारी स्पर्धा अपील लवादानेही पुष्टी करून एनएसईवर दोषारोप कायम ठेवला. या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचे एनएसईने जाहीर केले आहे.
मे २०११ मध्ये स्पर्धा आयोगाने, चलनाच्या वायदा व्यवहाराच्या (करन्सी डेरिव्हेटिव्हज्) क्षेत्रात एनएसईने आपल्या स्पर्धक बाजारमंचांना नामोहरम करण्यासाठी अनुचित व्यापारप्रथांचा अवलंब केल्याचा ठपका ठेवला होता. महिनाभराने अंतिम निकाल देताना, आयोगाने एनएसईवर ५५.५ कोटी रुपयांचा दंड आकारताना, उचित व्यापार पद्धतींना बाधा आणणाऱ्या गोष्टींना पायबंद घालण्याचा आदेश दिला होता. ‘एमसीएक्स-एसएक्स’ या त्या समयी नव्याने उदयाला आलेल्या शेअर बाजाराने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन चौकशी केल्यानंतर स्पर्धा आयोगाने हे कारवाईचे पाऊल टाकले होते. लवादाच्या निर्णयाचे एमसीएक्स-एसएक्सने स्वागत केले आहे.