एचपीसीएलची ओएनजीसीकडून खरेदी?

देशात एकच मोठी सरकारी तेल व वायू विपणन व विक्री कंपनी असावी, या सरकारच्या उद्दिष्टाची लवकरच पूर्ती होण्याची चिन्हे आहेत. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एचपीसीएलच्या खरेदीची ओएनजीसी (ऑइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन)ने तयारी दाखविली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१७-१८ चा अर्थसंकल्प चालू महिन्याच्या सुरुवातीला संसदेत सादर करताना एकाच मोठय़ा सरकारी तेल व वायू कंपनीबाबतचे संकेत दिले होते. याबाबतचा आधीचा प्रस्ताव हा काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या कारकीर्दीतील होता. ओएनजीसी ही देशातील सर्वात मोठी तेल व वायू उत्पादन कंपनी असून कंपनीत सरकारचा सर्वाधिक हिस्सा आहे, तर ओएनजीसी खरेदी करू पाहत असलेल्या एचपीसीएलमध्ये सरकारचा ५१.११ टक्के हिस्सा आहे. खुल्या भागविक्री प्रक्रियेद्वारे सरकार एचपीसीएलमधील २६ टक्के हिस्सा भागधारकांकडून खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे. हे विलीनीकरण ४४,००० कोटी रुपयांचे आहे. विलीनीकरणानंतर जगातील तिसरी मोठी तेल कंपनी अस्तित्वात येणार आहे.+ प्रमुख तेल कंपन्यांच्या एकत्रिकरणाची योजना

भारतात सहा कंपन्या तेल व वायू क्षेत्रात आहेत. ओएनजीसी व्यतिरिक्त ऑईल इंडियाही तेल व वायूचे उत्पादन घेते. तर एचपीसीएलसह बीपीसीएल (भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड) व आयओसी (इंडियन ऑईल कॉर्पोरेशन) या दोन कंपन्या तेल व वायूची विक्री व विपणन क्षेत्रात आहेत. गेल ही सरकारी कंपनी तेल वाहतूक व्यवसायात कार्यरत आहे. याशिवाय प्रमुख सहा प्रवर्तक कंपन्यांच्या ओएनजीसी विदेश, चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन, नुमालिगड रिफायनरी, मँगलोर रिफायनरी या उपकंपन्या आहेत. प्रमुख आणि उपकंपन्या यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्याऐवजी आघाडीच्या प्रमुख तेल कंपन्यांचे एकत्रिकरणाची सरकारची योजना आहे.

भांडवली बाजारातील प्रवास

ओएनजीसी

  • रु. १९४.४५ (-०.६१%)

एचपीसीएल

  • रु. ५५९.७० (-१.९८%)

बीपीसीएल

  • रु. ७०८.०० (-१.१४%)

आयओसी

  • रु. ३८६.५५ (+०.३८%)