इंधनाबाबत अमेरिकेचे वाढते स्वावलंबन आणि परिणामी त्या देशाला पुरवठा होणाऱ्या कच्च्या तेलात सौदी अरेबियाने केलेल्या कपातीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर हे गेल्या चार वर्षांच्या तळाला आले आहेत. मंगळवारी येथील बाजारात ब्रेन्ट क्रूड म्हणजे भारताकडून आयात होणाऱ्या कच्च्या तेलाचे दर प्रति पिंप थेट ८२ डॉलपर्यंत घसरले.
मंगळवारच्या अवघ्या एका दिवसाच्या व्यवहारात ब्रेन्ट क्रूड तब्बल तीन टक्क्य़ांनी रोडावले.
कच्च्या तेलाच्या किमतीची ही पातळी २०१० नंतरची सर्वात नीचांकी आहे. तर अमेरिकेच्या बाजारातील कच्चे तेलही ७६.३८ डॉलर प्रति पिंप असे २०११ नंतरच्या किमान स्तरावर पोहोचले आहेत. अमेरिकेने तेलाचे उत्पादन वाढविल्यानंतर, तेल उत्पादक आखाती देशांवर स्वस्तात तेल पुरवठा करण्याची वेळ आली आहे.