तेल भडक्याबाबत अर्थ राज्यमंत्र्यांची ग्वाही
आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे दर ६० डॉलर प्रति पिंपपर्यंत राहिले तरी त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी गुरुवारी येथे दिली. वाढत्या इंधन दरामुळे वस्तूंच्या किमती वाढणार नाहीत, अशा शब्दात त्यांनी याबाबतची सरकारची आर्थिक गणिते चुकणार नसल्याचा दावा केला.
गेल्या काही दिवसांपासून ५० डॉलर प्रति पिंपावरील दरापुढील वाटचाल करणाऱ्या खनिज तेलाचे दर सध्या जवळपास वर्षभराच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. इंधनाचे दर आता प्रति पिंप ५२ डॉलरवर प्रवास करत आहेत. याबाबत वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सिन्हा यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत काळजी करण्याचे कारण नाही, असे सांगितले.
खनिज तेलाचे दर प्रति पिंप ४० ते ६० डॉलर राहिल्यास चिंतेचे कारण नाही; मात्र ६० डॉलर प्रति पिंपापेक्षा ते वाढल्यास ही बाब चिंतेची बनू शकते, असे सिन्हा म्हणाले. उलट तेल दरात कपात झाल्यास ते देशाची आयात तसेच महागाईच्या पथ्यावर पडू शकते, असेही त्यांनी सांगितले.
तेलाचे दर प्रति पिंप ४० ते ६० डॉलर दरम्यान राहण्याचा अंदाज अनेक विश्लेषकांनी बांधला आहे, असे नमूद करत सिन्हा यांनी प्रत्यक्षात ते या दरम्यान राहिले तर उत्तमच; मात्र ते या पल्याड गेल्यास काळजीचे ठरेल, असे सांगितले.
खनिज तेलाच्या वाढत्या किमती हे भारतासाठी चांगले नसले तरी सध्याच्या पातळीवर ते राहिल्यास परिस्थिती हाताळण्यासारखी असेल, असे सांगत सिन्हा यांनी सध्याच्या स्तरापेक्षा त्यात खूप वाढ झाल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतील, असेही स्पष्ट केले.
भारताची तेल आयात निर्भरता ८० टक्क्यांपर्यंत आहे. खनिज तेल पिंपामागे एक डॉलरने जरी वाढले तरी देशाला एका वर्षांकरिता ९,१२६ कोटी रुपये (१.३६ अब्ज डॉलर) खर्च करावे लागतात. याचा भार अर्थातच देशाच्या तिजोरीवर तसेच महागाईवर होतो.
२०१५-१६ मध्ये भारताने तेल आयातीवर ६३.९६ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. आधीच्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत ही रक्कम निम्मी होती. तर २०१३-१४ मध्ये तेल आयातीवर १४३ अब्ज डॉलर खर्च झाले आहेत. तेलाचा सरासरी ४८ डॉलर प्रति पिंप दर गृहीत धरल्यास चालू आर्थिक वर्षांत ६६ अब्ज डॉलर तेल आयात खर्च येण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर २०१६ नंतर प्रथमच खनिज तेल प्रति पिंप ५० डॉलपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे मार्च २०१६ पासून भारतातील पेट्रोलचे दर पाच वेळा वाढले आहेत. या दरम्यान पेट्रोलचे दर प्रति लिटर ८.९९ रुपये तर डिझेलच्या किमती प्रति लिटर ९.७९ रुपयांनी वाढले आहेत. पेट्रोलच्या किमतीतील प्रत्येक रुपयाच्या वाढीमुळे घाऊक महागाईच्या दरात ०.०२ टक्के भर पडते. २०१४ तसेच २०१५ मध्ये जेव्हा इंधनाचे दर घसरले तेव्हा अतिरिक्त महसूल वाढीसाठी सरकारने पेट्रोल तसेच डिझेलवर नऊ पट उत्पादन शुल्क लागू केले होते.