आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल दराने पुन्हा एकदा मोठी उसळी घेतली आहे. लंडनच्या ब्रेंट क्रूडसह अमेरिकेतील तेलाच्या किमतीही तब्बल १०.३ टक्क्यांपर्यंत शुक्रवारी वाढल्या. तेल दरातील एका दिवसाच्या सत्रातील ही २००९ मधील आर्थिक अरिष्टानंतरची सर्वोत्तम झेप ठरली आहे.
ब्रेंट क्रूड तेलात प्रतिपिंप २.४५ डॉलरची वाढ होऊन ते ४७.५० डॉलरवर गेले आहेत. तर अमेरिकेच्या बाजारातील खनिज तेलाच्या दरांनीही एकाच व्यवहारात २.९५ डॉलरने वाढून ४३ डॉलर प्रति पिंप पोहोचले आहेत.
तेल दरातील एकाच व्यवहारातील तब्बल १० टक्क्यांची वाढ मार्च २००९ नंतर प्रथमच अनुभवली गेली आहे. यामुळे गेल्या साडेसहा वर्षांच्या तळातूनही तेल दर सावरले आहेत. साप्ताहिक तुलनेतही दोन महिन्यांनंतर प्रथमच तेल दरांनी वाढ नोंदविली आहे. अमेरिकेसह जगात इतरत्र भांडवली बाजारातील तेजीमागेही खनिज तेलाच्या किमतीतील सुधार हेच कारण असल्याचे आढळून येते. त्यातच अमेरिकेचा आर्थिक विकास दर ३ टक्क्यांपुढे सरकणे हे तेल दरांमधील वाढीला कारणीभूत ठरले.