देशातील आघाडीच्या टॅक्सी सेवा कंपनी असलेल्या ओला कॅब्सने तिचीच एक स्पर्धक राहिलेल्या टॅक्सीफॉरशुअरला आपल्या ताब्यात घेतले आहे. रोकड आणि समभाग स्वरुपातील हा व्यवहार २० कोटी डॉलरचा आहे. यामुळे ओला कॅब्सच्या ताब्यातील टॅक्सी संख्या वाढण्यासह तिचे जाळेही अधिक विस्तारले जाणार आहे.
टॅक्सीफॉरशुअरकडे १,७०० कर्मचारी आहेत. तर देशातील ४७ शहरांमध्ये कंपनीची १५ हजारांहून अधिक वाहने आहेत. टॅक्सीफॉरशुअरचे कर्मचारी ओला कॅब्सचे कर्मचारी म्हणून यापुढेही कायम राहतील, अशी ग्वाही टॅक्सीफॉरशुअरचे संस्थापक अपरंमेय राधाकृष्ण व रघुनंदन जी यांनी दिली. या व्यवहारानंतर टॅक्सीफॉरशुअरचे मुख्य परिचलन अधिकारी अरविंद सिंघल यांना मुख्य कार्यकारी म्हणून पदोन्नती दिली गेली आहे.

ओला कॅब्सचे सह संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अगरवाल यांनी टॅक्सीफॉरशुअरच्या खरेदीमुळे ओला कॅब्सचे बळ वाढल्याचा दावा यानिमित्ताने केला. दोन्ही कंपन्यांचे ध्येय एकच असल्याचा समान धागा असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
देशातील आघाडीची टॅक्सी सेवा प्रदाता कंपनी म्हणून ओळख असलेल्या ओला कॅब्जला प्रसिद्ध टायगर ग्लोबलचे आर्थिक पाठबळ आहे. त्याचबरोबर मॅट्रिक्स पार्टनर्स, सिक्योआ कॅपिटल, स्टीडव्ह्य़ू कॅपिटल यांनीही आर्थिक सहकार्य ओला कॅब्जला दिले आहे. सॉफ्टबँक या प्रसिद्ध वित्त पुरवठादार कंपनीनेही ओला कॅब्जमध्ये नुकतेच मोठे भांडवल ओतले आहे.
ओला कॅब्ज खरेदी करत असलेल्या टॅक्सीफॉरशुअरमध्ये एस्सेल पार्टनर्स, बेसेमर व्हेन्चर पार्टनर्स आणि हेलिऑन व्हेन्चर्स पार्टनर्स यांचा निधी आहे.