वाहन ताफ्यात लवकरच दुपटीने वाढ अपेक्षित
शहरांतर्गत वाहतुकीसाठी भाडय़ाने वाहन मिळवून देणारे सर्वात लोकप्रिय मोबाइल अ‍ॅप असलेल्या ‘ओला’ने आपल्या वाहनचालकांचे परिचालकाकडे संक्रमण तसेच एकापेक्षा अधिक वाहनांची मालकी असलेल्यांना व्यावसायिक बनण्याची संधी देणारे ‘ओला ऑपरेटर’ अशा नवीन मोबाइल व्यासपीठाची घोषणा शुक्रवारी येथे केली. या नव्या उपक्रमांतून नजीकच्या काळात सेवेतील वाहन ताफा दुपटीने वाढून ४.५ लाखांवर जाण्याचे तिला अपेक्षित आहे.
ओलाच्या व्यासपीठावर एका कारपासून सुरुवात करीत अल्पावधीत वाहनांचा मोठा ताफ्याचे संचालन करणारा व्यवसाय सांभाळणाऱ्यांची संख्या आजही मोठी आहे. अशा मंडळींनी साधलेली ही व्यावसायिक किमया व्यापक स्तरावर सर्वाना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘ओला ऑपरेटर’ हे नवीन मोबाईल अ‍ॅप सुरू करीत असल्याचे ओलाचे वरिष्ठ संचालक (विपणन) आनंद सुब्रह्मण्यन यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सध्या भारतातील १०२ शहरांत ओलाची परिवहन सेवा कार्यरत, दिवसाला सरासरी १० लाख फेऱ्या तिच्या चालकांकडून केल्या जातात. ओलाचे चालक हे आपल्या दृष्टीने उद्योजकच असून, त्या प्रत्येकाला आपल्या सेवेत आणखी काही चालकांना रोजगाराची संधी ‘ओला ऑपरेटर’द्वारे देता येईल. शहरातील छोटे-मोठे प्रस्थापित टूर ऑपरेटर, प्रवास सेवा, वाहनांची मालकी असलेले व्यक्ती यांना ‘ओला ऑपरेटर’ उपक्रमात सहभागासाठी लक्ष्य करण्यात येणार असून, प्रतिदिन १,२०० ते १,३०० कार या सेवेत नव्याने दाखल होतील, असा प्राथमिक कयास असल्याचे सुब्रह्मण्यन यांनी स्पष्ट केले. या व्यासपीठावर येणाऱ्या व्यावसायिकांना त्यांच्या ताफ्यातील कितीही संख्येने असलेली वाहने ‘ओला ऑपरेटर’वर दाखल करता येतील.
या व्यवसायातून वार्षिक ३० ते ४० टक्के दराने मिळू शकणारा परतावा पाहता, कारवर केलेली गुंतवणूक पहिल्या तीन वर्षांत वसूल करता येणारी ही व्यवसाय संधी ठरते. सध्या ओलाच्या ताफ्यातील ७० टक्के वाहने ही चालक-उद्योजकांद्वारे तर ३० टक्के वाहने ही परिचालकांकरवी व्यवसाय करीत आहेत.