अ‍ॅमेझॉनसह २१ कंपन्यांना सरकारची नोटीस

जुने फोन दुरुस्त करून त्याची नव्याने विक्री केले प्रकरणात सरकारने अ‍ॅमेझॉनसारख्या आघाडीच्या २१ इ-कॉमर्स कंपन्यांना नोटीस बजाविली आहे. याबाबतच्या विविध नियमांचे या कंपन्यांनी उल्लंघन केले असून अशा विद्युत उपकरणांची आयात ताबडतोब थांबविण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अ‍ॅमेझॉनसह स्नॅपडिल, इबे, ओएलएक्स, क्विकर अशा विविध २१ आघाडीच्या इ-कॉमर्स कंपन्यांना २३ सप्टेंबर रोजी नोटीस कंपनीला पाठविली. यामध्ये कंपनीला जुने फोन आयात करण्यास तसेच ते विकण्यास मनाई करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. पर्यावरण विषयक कायद्याचा हवाला देत कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आपण नियमांचे उल्लंघन केले असून तुमच्याविरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये, असे पत्र अ‍ॅमेझॉनलाही पाठविण्यात आले आहे. या अंतर्गत कमाल पाच वर्षे कैद आणि किंवा एक लाख रुपयांचा दंड अशी तरतूद आहे.

दरम्यान, अ‍ॅमेझॉन कंपनीने आम्ही केवळ इतरांकडून वस्तू घेऊन त्या ग्राहकांना विकतो; तरीदेखील आम्ही सरकारकडून मिळालेल्या नोटीशीनंतर शहानिशा करत आहोत, असे स्पष्ट केले आहे.

सरकारने स्नॅपडिल, इबे, ओएलएक्स, क्विकर अशा अन्य कंपन्यांनाही अशाच प्रकारची नोटीस पाठविताना जुन्या फोनची आयात तसेच त्यांची विक्री थांबविण्याचे आदेश दिले आहेत.