प्रिमियम मोबाईल हॅन्डसेट निर्मितीतील आघाडीच्या वनप्लसने ‘मेक इन इंडिया’वर भर दिला असून चालू तिमाहीत स्थानिक पातळीवर मोबाईल हॅन्डसेट उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. कंपनी आंध्र प्रदेशमधील प्रकल्पात मोबाईल हॅन्डसेटची निर्मिती करणार आहे. कंपनी सध्या चीनमधून तयार करण्यात येणारी उत्पादने भारतासाठी आयात करते.
वन प्लस प्रिमियम मोबाईल हॅन्डसेट निर्मिती क्षेणीत मोडली जाते. कंपनीची सध्या निवडक तीन उत्पादने भारतात उपलब्ध आहेत. सध्या ऑनलाईन माध्यमातून उत्पादने उपलब्ध करून देणाऱ्या वन प्लसने सेवा केंद्राच्या विस्ताराची योजनाही आखली आहे. याअंतर्गत कंपनी देशभरातील प्रमुख ७० शहरांमध्ये तिचे सेवा केंद्र सुरू करेल. येथे वनप्लस मोबाईलची विक्री तसेच दुरुस्ती आदी सर्व सुविधा एकाच मंचावर उपलब्ध होतील.
कंपनीचे भारतातील सर व्यवस्थापक विकास अगरवाल यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, भारतातून मोबाईल हॅन्डसेट निर्मिती करण्याची वनप्लसची योजना असून तिला येत्या काही महिन्यातच आकार येईल. कंपनी तिचे दक्षिण भारतातील अस्तित्व त्यासाठी विस्तारत असून हॅन्डसेट आयातीवरील तिची निर्भरता कमी करून देशात मोबाईलचे उत्पादन सुरू केले जाई, असेही ते म्हणाले. भारतातील मोबाईल बाजारापेठेतील स्थान भक्कम करण्यासाठी सेवा सुविधांवर भर देणाऱ्या वन प्लस इंडियाने क्षेत्रात प्रथमच पारदर्शक व्यवसायाचा भाग म्हणून मोबाईलच्या सुटय़ा भागांकरिता त्याच्या किंमती जाहीर केल्या आहेत. तर वनप्लस एक्स सिरॅमिक हा नवा फोन चालू महिन्याच्या सुरुवातीलाच सादर करण्यात आला आहे.