ऑनलाइन मंचावरून होणारी कर्मचारी भरती गेल्या महिन्यात थेट ३२ टक्क्यांनी वाढल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेबाबत विश्वास यातून प्रेरित होत असून गेल्या वर्षांच्या तुलनेत जुलैमधील प्रमाण वाढल्याचे मॉन्स्टर.कॉमने म्हटले आहे.
संकेतस्थळाच्या माध्यमातून कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यामध्ये मॉन्स्टर.कॉम आघाडीवर आहे. तिच्या यंदाच्या कर्मचारी निर्देशांकानुसार, जुलैमधील वाढ ही २०१५ मधील सर्वोच्च आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर कर्मचारी भरतीचे प्रमाण ३.२४६ टक्क्यांनी वाढले आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय मोदी यांनी दिली.
भारतातील कर्मचारी भरती क्षेत्रात एकूणच सध्या वातावरण उंचावले असून त्यात एक प्रकारची स्थिरता येत असल्याचे निरीक्षणही मोदी यांनी नोंदविले. कंपनीने केलेल्या विविध क्षेत्रांमध्ये निर्मिती तसेच वाहन उत्पादन क्षेत्रात यंदा हालचाल नोंदविली गेल्याचेही ते म्हणाले. ‘मेक इन इंडिया’, ‘स्मार्ट सिटीज’सारखे सरकारचे प्रोत्साहनपूरक कार्यक्रम एकूणच अर्थव्यवस्थेत कंपन्यांच्या बाजूने चैतन्य निर्माण करणारे ठरत असल्याचेही मोदी म्हणाले.