म्यानमारचे अध्यक्ष यू थेन सेन यांनी आपल्या भारत दौऱ्यात येथील उद्योजकांना देशातील पायाभूत सेवा तसेच तेल व वायू क्षेत्रात गुंतवणुकीचे आवाहन केले. भारताच्या सागरी हद्दीतील तेल व वायू संसाधनांचा चांगल्या रितीने उपयोग करणाऱ्या येथील उद्योगांना म्यानमार भागातही ही संधी आहे, असेही ते यावेळी म्हणाले. ‘भारतीय उद्योग महासंघ’च्या (सीआयआय) वतीने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या संवाद कार्यक्रमास अध्यक्ष अदि गोदरेज हेही उपस्थित होते.
म्यानमारसाठी भारत हा चौथा मोठा व्यावसायिक भागीदार देश आहे. २०११-१२ दरम्यान भारतासाठी म्यानमारची निर्यात १०४ कोटी डॉलर राहिली आहे. वार्षिक तुलनेत ही वाढ २० टक्के आहे. तर ६६.५ टक्के वाढ राखत भारताने म्यानमारला गेल्या आर्थिक वर्षांत १३४ कोटी डॉलरची निर्यात केली आहे.