चीनी निर्देशांकाची ८ टक्क्य़ांपर्यंतची आपटी आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील विदेशी गुंतवणूकदारांवरील (पी-नोट्स) र्निबध अनिश्चिततेने प्रमुख निर्देशांक सोमवारी घुसळून निघाले. असे करताना सेन्सेक्सने गेल्या जवळपास दोन महिन्यातील सर्वात मोठी घसरण नोंदविताना मुंबई निर्देशांकाला त्याच्या महिन्याभराच्या तळात आणून ठेवले.
सेन्सेक्सने सुरुवातीपासून मोठी घसरण नोंदविताना सोमवारी २८ हजाराचा टप्पाही सोडला. तर निफ्टीने ८,४०० चा स्तर सोमवारी सोडला. मुंबई निर्देशांकाची सोमवारची घसरण ही २ जूननंतरची सर्वात मोठी घसरण ठरली.  सेन्सेक्समधील केवळ बजाज ऑटो हा एकच समभाग मूल्य वाढीच्या यादीत नाममात्र राहिला. इतर सर्व २९ समभाग घसरले. यात टाटा स्टील, हीरो मोटोकॉर्प, हिंदाल्को, अ‍ॅक्सिस बँक हे आघाडीवर राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सर्वाधिक फटका पोलाद निर्देशांकाला बसला. पाठोपाठ भांडवली वस्तू, बँक क्षेत्रानेही निर्देशांक घसरणीचे पडसाद उमटविले. मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही एक टक्क्य़ाहून अधिक घसरले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीचा सोमवारचा प्रवास सत्रात ८,३५१.५५ पर्यंत घसरला.
गुंतवणूकदारांच्या १.५० मालमत्तेवर पाणी
मंदीतील चीनबाबत येथील भांडवली बाजारावर प्रतिक्रिया उमटल्याने मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ताही सोमवारी १.५० लाख कोटी रुपयांनी कमी झाली. पी-नोट्सवरील संभाव्य र्निबधाने देशातील सर्वात जुन्या बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांची एकूण मालमत्ता दिवसअखेर १,०२,६२,५७९ कोटी रुपये नोंदली गेली. ती शुक्रवारच्या तुलनेत १,५०,९९४.८० कोटी रुपयांनी कमी झाली.