पिपावाव डिफेन्सचे नामांतरही होणार
अतिरिक्त २६ टक्के हिस्सा खरेदी * डिसेंबरपासून प्रक्रिया वेग धरणार
पिपावाव डिफेन्स अ‍ॅन्ड ऑफशोअर इंजिनिअर कंपनी कंपनी कर्ज पुनर्बांधणी प्रक्रियातून बाहेर पडणार आहे. कंपनीवर अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची मालकी येताच हे धोरण अंमलात येणार आहे.
रिलायन्स – अनिल धीरुभाई अंबानी समुहातील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने पिपावाव डिफेन्समधील अतिरिक्त २६ टक्के हिस्सा खरेदीचे यापूर्वीच जाहीर केले आहे. यानुसार कंपनीची खुली भाग प्रक्रिया येत्या २ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. १५ डिसेंबर दरम्यान ही प्रक्रिया चालेल.
यासाठी रिलायन्सने १,२६३ कोटी रुपये मोजण्याची तयारी दाखविली आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही रिलायन्स डिफेन्स सिस्टिम्स या तिची अन्य सह कंपनीबरोबर या प्रक्रियेत भाग घेईल.
पिपावाव डिफेन्सवर यामाध्यमातून रिलायन्सची मालकी येणार असल्याने कंपनीच्या कर्ज पुनर्बांधणी योजनेतून माघार घेतली जाईल, असे पिपावाव डिफेन्सने स्पष्ट केले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेनंतर कंपनीचे नावही रिलायन्स डिफेन्स अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग लिमिटेड होईल, असे रिलायन्सने स्पष्ट केले आहे. पिपावाव डिफेन्सच्या कंपनी कर्ज पुनर्बांधणी योजनेला मार्च २०१५ मंजुरी देण्यात आली होती.