माध्यमांना या प्रशासकीय निर्णयापासून दूर राहण्याची पंतप्रधानांची सूचना
सत्ताधारी भाजपच्या गोटातून गंभीर टीका होत असलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या बचावासाठी उद्योगक्षेत्र सरसावल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. ‘अत्यंत उजळ पूर्वपीठिका असलेल्या राजन यांची गव्हर्नरपदी दुसऱ्यांदा नियुक्तीच्या मुद्दय़ावर राजकारण्यांनी टीकाटिप्पणी करणे टाळावे,’ असे मत उद्योगक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अ‍ॅसोचॅमने नोंदविले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्या उलट मोदी यांनी हा एक प्रशासकीय निर्णय असून, माध्यमांमधून त्यावर चर्चा झडणे गैर असल्याचे मत नोंदविले.
कोणता गंभीर गुन्हा घडल्याचे आढळून आले नसताना, नाहक रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नर यासारख्या महत्त्वाच्या पदाबाबत वादंग उभा करणे अनाठायी आहे, असे अ‍ॅसोचॅमने शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या राजन यांना तात्काळ गव्हर्नरपदावरून पदच्युत करण्याची मागणी आणि त्यांनी केलेल्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर अ‍ॅसोचॅमला ही भूमिका घ्यावी लागली आहे.
भारताची अर्थव्यवस्था आजच्या घडीला अन्य उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत सुस्थितीत आहे आणि याकामी रिझव्‍‌र्ह बँकेची भूमिका आणि कामगिरी खूपच महत्त्वाची राहिली आहे, अशी अ‍ॅसोचॅमने प्रशस्तीची पावती दिली आहे. गव्हर्नरपदी राज यांची फेरनियुक्ती करायची की नाही, हा पूर्णत: सरकारच्या अधिकारात येणारा प्रश्न आहे. परंतु राजकारणी मंडळींकडून जाहीरपणे सुरू असलेली चिखलफेक ही देशाच्या वित्तीय व्यवस्थेला मानवणारी नसल्याचे प्रसिद्धीपत्रकाचे म्हणणे आहे. जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ राजन यांनीच रिझव्‍‌र्ह बँकेचे प्रमुख या नात्याने भारताच्या वित्तीय प्रणालीबाबत सदिच्छा व सन्मानाची स्थिती निर्माण केल्याचे अ‍ॅसोचॅमने म्हटले आहे.
दरम्यान, राजन यांची फेरनियुक्ती हा माध्यमांकडून चघळला जावा असा विषय नसल्याचे नमूद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वादंगाबाबत पहिल्यांदाच आपला अभिप्राय दिला. कोणताही प्रशासकीय निर्णयाचा मुद्दा हा माध्यमांच्या स्वारस्याचा विषय बनू नये, असे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिलेल्या प्रतिक्रियेत मोदी म्हणाले. शिवाय यासंबंधी निर्णयासाठी सप्टेंबपर्यंतचा अवधी आहे, अशी पुस्तीही त्यांनी ‘राजन यांच्या फेरनियुक्तीला त्यांचा पाठिंबा आहे काय?’ या प्रश्नाच्या उत्तरादाखल जोडली. राजन यांचा रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून येत्या ४ सप्टेंबर रोजी तीन वर्षांचा कार्यकाळ संपत आहे.

राजन यांची धोरणे शेतीविरोधी; स्वामींचे नवे टीकास्त्र
नवी दिल्ली : रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून राजन यांची धोरणे हे लघुउद्योगांना संपविणारी आणि शेतीविरोधी आहेत, असे नव्याने टीकास्त्र भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी शुक्रवारी सोडले. त्यांची बँकिंग धोरणे हे शेतकरीविरोधी ठरली आहेत. अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्यांना मोकळे रान देऊन, येथील लघू व मध्यम उद्योगांना संपविणाऱ्या चुकीच्या धोरणांवर मतप्रदर्शन आपण करीत राहू, असे स्वामी यांनी ‘भारतीय किसान अभियान’च्या कार्यक्रमांत बोलताना मत व्यक्त केले. गुरुवारीच स्वामी यांनी राजन यांची गव्हर्नर पदावरून तात्काळ हटविण्याची फेरमागणी करणारे १५ दिवसांतील दुसरे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. या पत्रात त्यांनी सहा वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत.