‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचा आजपासून शुभारंभ
दुसरे नरिमन पॉइंट म्हणून ओळखले जाणाऱ्या बीकेसी (वांद्रे-कुर्ला संकुल) तील एमएमआरडीए मैदान आणि तेथपर्यंत पोहोचणारे रस्ते सध्या अतिस्वच्छ, मोकळे व शिस्तीचे जाणवत आहेत. त्याला निमित्तही अनोखे आहे. मरगळलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत चैतन्य निर्माण करण्याच्या प्रयत्नाला गती देण्यासाठी हे सारे काही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेची प्रसार-प्रदर्शन मांडणी ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या निमित्ताने मुंबईत होत आहे.
बीकेसीतील २.२० चौरस मीटर मैदानस्थळी भव्य उंच व मोठय़ा सभागृहांची रांगेत व्यवस्था करण्यात आली असून, त्या प्रत्येकावर रंगबिरंगी ‘औद्योगिक सिंहा’ची प्रतिकृती आहे. प्रदर्शनस्थळी विविध ११ क्षेत्रे आणि १३ राज्ये यांची स्वतंत्र दालने आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून तयारी सुरू करण्यात आलेल्या या प्रदर्शनस्थळी ३ हजारांहून अधिक कामगार कार्यरत होते. तर वाहतूक आदी १० हजारांहून अधिक रोजगार निगडित होते. ३५० हून अधिक अवजड वाहनांमधून येथे प्रदर्शनासाठी लागणाऱ्या सामग्रीची चढ-उतार होत होती.
प्रदर्शनस्थळी महाराष्ट्राच्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’चे दालन वैशिष्टपूर्ण असून राज्यातील सांस्कृतिक, औद्योगिक, कला-मनोरंजन, माहिती तंत्रज्ञान, कृषी-वन आदींचा वेध घेण्यात आला आहे. प्रदर्शन १३ ते १८ फेब्रवारीदरम्यान चालणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदर्शन केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर विविध दालनांमध्ये एकाच वेळी अनेक बैठका, चर्चासत्रांना प्रारंभ होणार आहे.
‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या निमित्ताने अनेक कंपन्यांनी त्यांच्या देशांतर्गत गुंतवणुका तसेच कराराचे नियोजनही केले आहे. सायंकाळी शहरात विविध ठिकाणी या सप्ताहाचा भाग म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

युरोपीय देशांकडून अधिक अपेक्षा – कांत
मुंबई :‘मेक इन इंडिया’ सप्ताहादरम्यान युरोपातील अधिकाधिक देशांचा सहभाग असून स्विडन, पोलंड, फिनलॅन्डकडून देशात विदेशी गुंतवणुकीचे अधिक करार होतील, अशी आशा प्रदर्शन आयोजनाचे नेतृत्व करणाऱ्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाचे (डीआयपीपी) सचिव अमिताभ कांत यांनी व्यक्त केली आहे. या अनोख्या प्रदर्शनाच्या माध्यमातून केवळ सेवा क्षेत्र अशी असलेली भारताची ओळख आता आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्मिती क्षेत्रातील आघाडीचा देश अशी होण्यास मदत मिळेल, असेही ते म्हणाले. केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठय़ा प्रमाणात एकाच वेळी अनेक क्षेत्रांवर प्रकाश टाकणारे अशा स्वरूपाचे हे पहिलेच प्रदर्शन असेल, असा दावाही त्यांनी केला.

विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढेल – बॅनर्जी
मुंबई : भारतातील सर्व उद्योग, सर्व क्षेत्र या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रथमच मोठय़ा प्रमाणावर सहभागी होत असून गेल्या वर्षांत नोंद झालेल्या ४० टक्के अधिकच्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणात ‘मेक इन इंडिया’ सप्ताहामुळे यंदा भर पडेल, असा विश्वास प्रदर्शन सहआयोजक ‘भारतीय उद्योग महासंघा’चे (सीआयआय) महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी सांगितले.
सप्ताहभर सुरू राहणारे उपक्रम आणि प्रदर्शनादरम्यान २०७ कंपन्यांचे ५००० हून अधिक व्यवसाय प्रतिनिधी उपस्थित राहणार असून ३ हजारांहून अधिक सामंजस्य व्यवहार, करार-मदार होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. प्रामुख्याने निर्मिती क्षेत्राला चालना देणाऱ्या या प्रदर्शनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील गेल्या १८ महिन्यांतील मरगळ निश्चितच दूर होईल, असेही ते म्हणाले.