सरकारी बँकेवर दुप्पट बुडीत कर्ज; तिप्पट तरतुदीचाही भार

स्टेट बँकेनंतर देशातील दुसरी मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांच्या अखेरच्या तिमाहीत विक्रमी तोटय़ाची नोंद केली आहे. जानेवारी ते मार्च २०१६ तिमाहीत बँकेने तब्बल ५,३६७ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला असून बँकेचे बुडीत कर्जाचे प्रमाण दुपटीने वाढले आहे; तर त्यासाठी करावी लागणारी तरतूद तिपटीने विस्तारल्याचा हा परिणाम आहे.
पाच सहयोगी बँका तसेच भारतीय महिला बँकेला विलीन करून घेण्याच्या तयारीत असलेल्या स्टेट बँकेपाठोपाठच पंजाब नॅशनल ही मोठी सार्वजनिक बँक आहे. तिचे तिमाही वित्तीय निष्कर्ष बुधवारी जाहीर झाले. मात्र त्यात तिने ५,३६७ कोटी रुपयांचा तोटा दर्शविला आहे. देशातील बँक इतिहासातील ही सर्वोच्च तोटय़ाची रक्कम आहे.
मार्च २०१६ अखेरच्या तिमाहीत तब्बल १२.९० टक्के ढोबळ अनुत्पादित मालमत्तेची नोंद करणाऱ्या या बँकेला गेल्या आर्थिक वर्षांच्या अखेरच्या तिमाहीत थेट ११,३८० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी लागली आहे. बँकेचे निव्वळ अनुत्पादित कर्ज प्रमाणही गेल्या तिमाहीत दुप्पट, ८.६१ टक्क्यांवर गेले आहे.
बँकेने २०१४-१५ या आर्थिक वर्षांत ३०६.५६ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. तर २०१५-१६ या संपूर्ण वित्त वर्षांत बँकेचा तोटा ३,९७४ कोटी रुपये नोंदला गेला आहे. गेल्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न १३,२७६ कोटींपर्यंत खाली आले आहे. तसेच व्याज उत्पन्नही १०,८२४ कोटी रुपयांपर्यंत घसरले आहे.

बँकेवर ऊर्जा, कृषी, मल्यांचा कर्जथकीताचा भार
बँकेने सध्या व्यवसाय संकटात असलेल्या ऊर्जा कंपन्या तसेच कृषी क्षेत्रात अधिकतर कर्ज वितरित केले आहे. बँकेने विजय मल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाची रक्कम ८०० कोटी रुपयांची आहे. हे कर्ज टप्प्या टप्प्याने देण्याच्या मल्या यांचा प्रस्ताव बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका उषा अनंतसुब्रमण्यन यांनी नाकारला आहे. तसेच बँकेने १,८३२ कोटी रुपयांचे बुडीत कर्ज मालमत्ता पुनर्बाधणी कंपन्यांना विकल्याचेही त्यांनी बुधवारी निकाल जाहीर करताना सांगितले.