गुंतवणूक फराळ

आमचा पुढील दिवाळीपर्यंत दृष्टीकोन मुख्यत्वे गृह सजावटीचे रंग, गृहसजावटीसाठी वापरले जाणारे प्लायवूड आदी ग्राहक उपयोगी वस्तू, प्रवासी वाहने खाजगी बँका वस्त्रनिर्मिती अभियांत्रिकी व निवडक औषध निर्माण कंपन्यांच्या बाबतीत सकारात्मक आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झालेला सातवा वेतन आयोग, एक हुद्दा एक सेवा निवृत्ती वेतन, यामुळे ग्राहकांकडे अतिरिक्त रोकड सुलभता असेल या रोकड सुलभतेचा विनियोग ग्राहकांकडून प्रामुख्याने गृह सजावट व वाहन खरेदीसाठी होणार असल्याने या प्रकारची उत्पादने असलेल्या कंपन्यांच्या नफ्यात येत्या वर्षभरात वृद्धी संभवते. ही खरेदी बहुतांश ग्राहक कर्ज घेऊन करणार असल्याने या खरेदीच्या अप्रत्यक्ष लाभार्थी बँका असून आम्ही खाजगी बँकाच्या मुल्यांकना बाबत सकारात्मक आहोत. सरकारकडून पायाभूत सुविधांच्या विकासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. या वर्षी केवळ नवीन रस्त्यांसाठी २.१८ लाख कोटींची तरतूद सरकारने अर्थसंकल्पात केली आहे. सरकारच्या या धोरणाच्या लाभार्थी प्रामुख्याने अभियांत्रिकी कंपन्या, भांडवली वस्तू उत्पादक, वाणिज्य वाहन निर्मात्या कंपन्या लाभार्थी असल्याने योग्य मूल्यांकन मिळाल्यास आम्ही त्यांचा ही गुंतवणुकीसाठी विचार करू. मागील दोन वर्षांंपासून नियमनामुळे अडचणीत सापडलेला औषध निर्माण उद्य्ोग नक्कीच गुंतवणुकीसाठी खुणावतोय. मागील दोन वर्षांंच्या तुलनेत औषध कंपन्यांचे मुल्यांकन आकर्षक पातळीवर आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने काही भारतीय उत्पादकावर कारवाईच्या नोटीसी बजावल्याचा परिणाम त्यांच्या समभागांच्या किंमतीत मोठी घसरण झाली. दरम्यानच्या काळात औषध निर्मात्यांनी नोटीसींना उत्तर देत ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटींचे निराकरण केल्याने सध्या बंदी असलेल्या कारखान्यातून अमेरिकेत पुन्हा औषधांची निर्यात रुजू होईल.

(लेखक बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडाचे सह मुख्य गुंतवणूकअधिकारी (समभाग) आहेत.