चालू वर्षांत तीन वेळा व्याजदरात कपात केल्यानंतर यंदा स्थिर राहिलेल्या पतधोरणानंतरही आगामी कालावधीत पुन्हा दरकपातीबाबत आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था, पतमानांकन संस्था यांनी मात्र आशा व्यक्त केली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वी पाऊण टक्क्य़ापर्यंत केलेल्या दरकपातीचा थेट परिणाम अद्याप जाणवला नसल्याचे समर्थन यंदाच्या स्थिर पतधोरणासाठी मूडीजने केले आहे.
काहीशा उशिराने झालेल्या मान्सूनमध्ये आणखी प्रगती येणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावर फेडरल रिझव्‍‌र्ह तसेच कच्च्या तेलाचे दर हे घटक मध्यतर्वी बँकेला दरकपात करण्यास भाग पाडतील, असा विश्वास मूडीजने व्यक्त केला आहे.
अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने येत्या सप्टेंबरमध्ये अपेक्षित व्याजदर वाढ केली तरी त्याचा धक्का येथे सहन केला जाईल, या आपल्या मताच्या पुष्टय़र्थ मूडीजने स्थानिक पातळीवरील चांगला पाऊस तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होत असलेले खनिज तेलाचे दर या बाबी मांडल्या आहेत.
चालू वर्षांत आणखी पाव टक्क्य़ाची दरकपात करण्यास रिझव्‍‌र्ह बँकेला पुरेसा वाव असल्याचे मत एचएसबीसीने आपल्या अहवालात व्यक्त केले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्थिर व्याजदर पतधोरणानंतर लगेचच जारी या अहवालात येत्या काही महिन्यात महागाई दरात आणखी उतार अपेक्षित केला आहे. एचएसबीसीला चालू आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत पाव टक्क्य़ाची दरकपात अपेक्षित आहे.
उद्योगजगतात नाराजी
मुंबई : गेल्या सात महिन्यात चौथी व्याज दरकपात टाळणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या यंदाच्या स्थिर पतधोरणाबाबत स्थावर मालमत्ता क्षेत्रासह तमाम उद्योग क्षेत्राने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सुधार येत असलेला मान्सून व कमी होत असलेले तेलाचे दर यामुळे मार्च २०१६ पर्यंत किमान अध्र्या टक्क्य़ाची तरी व्याज दरकपात व्हायला हवी, अशी अपेक्षा असोचेम या उद्योग संघटनेचे अध्यक्ष व खासगी बँक येस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांनी व्यक्त केली आहे.
भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय) महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, जानेवारीपासून सुरू झालेल्या व्याज दरकपातीचे धोरण यंदा पुन्हा सुरू होणे गरजेचे होते. पतमागणी सध्या कमकुवत आहे तसेच कंपन्या, बँका या प्रामुख्याने पायाभूत सेवा क्षेत्रामुळे मोठय़ा मालमत्तेच्या दबावाखाली आहेत. यंदाच्या व्याज दरकपातीने गुंतवणुकीला चालना मिळाली असती, असेही बॅनर्जी म्हणाले.
स्थिर व्याजदर ठेवत रिझव्‍‌र्ह बँकेने तमाम उद्योग क्षेत्राची नाराजी ओढवून घेतल्याचे मत फिक्कीच्या अध्यक्षा ज्योत्सा सुरी यांनीही व्यक्त केले आहे.
निर्मिती व स्थावर मालमत्ता क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी व्याज दरकपात आवश्यकच आहे, असे मत व्यक्त करत क्रेडाई या देशव्यापी मंचाने रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्थिर पतधोरणाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. कमी मागणी आणि वाढते व्याजदर तसेच खर्च यामुळे भविष्यात तरी सुसह्य़ता मिळेल, अशी आशा संघटनेचे अध्यक्ष गेतांबर आनंद यांनी व्यक्त केली आहे. स्थावर मालमत्ता बाजारपेठ जोपर्यंत व्याज दरकपात होत नाही, तोपर्यंत मंदीच्या सावटाखालीच असेल, असे नारेडको या अन्य संघटनेचे अध्यक्ष नवीन रहेजा यांनी म्हटले आहे.

स्थिर व्याजदराचे पतधोरण जाहीर करत मध्यवर्ती बँकेने यंदा तिचा सावध पवित्राच स्पष्ट केला आहे. मात्र यंदा मान्सून चांगला झाल्यास येत्या महिन्यातच पाव टक्क्य़ाची दरकपात सहज शक्य आहे. अद्याप मान्सूनचे चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्याच्या लहरीवरच आगामी दरनिश्चिती असेल.
’  सी. रंगराजन,
रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर व पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार