मालमत्ता विभागणी केल्याने गुंतवणूकदाराला जोखीम घेण्याच्या इच्छेनुसार आपली गुंतवणूक समभाग, कर्ज, सोने, रोख रक्कम आणि मालमत्तेच्या इतर वर्गामध्ये विभागता येते. त्यामुळे मोठी जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदाराने समभागांमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे आणि नियत उत्पन्नासारख्या कमी जोखमीच्या मालमत्ता वर्गवारीमध्ये गुंतवणूक करावी.
सेन्सेक्सने कळस गाठला असला तरी, १० वर्षांतील रोखे उत्पन्न एप्रिलमधील ९ टक्क्यांच्या तुलनेत सध्या ८.३ टक्क्यांच्याही खाली आले आहे. अशा स्थितीत समभागांमध्ये आपण किती गुंतवणूक करावी आणि रोख्यात किती करावी हे अनेकांना कळेनासे होणे साहजिकच आहे. सरकारच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीमध्ये समभाग बाजारपेठेचा वाटा ५ टक्के आहे. त्यातील कंपनी उत्पन्न उत्तम आहे आणि प्रकल्पावरील खर्चही अधिक आहे. किंमती आणि उत्पन्न परस्परविरोधी असताना उत्पन्न अजून कमी होत गेले तर दोन्ही प्रकारच्या रोखे निधींना फायदा होऊ शकतो. स्थानिक बाजारपेठेतील महागाई सातत्याने कमी होणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती कमी होणे यामुळे कर्ज बाजारपेठेला फायदा होतो. त्यामुळे सर्वाचे डोळे आता २ डिसेंबरला जाहिर होणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाकडे लागले आहे.
बाजारपेठेत काय घडणार हे कुणीही खात्रीने सांगू शकतो का आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे ‘जर’ आणि ‘तर’च्या आधारावर गुंतवणूक करता येऊ शकते का? याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे.
२००७ मध्ये गुंतवणूकदारांनी बाजारपेठ चढय़ा पातळीवर असताना आणि मूल्यांकन चढे असतानाही समभाग फंडांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक केली होती आणि २००८ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीत आपले पसे गमावले होते. २००९ मध्ये बाजारपेठ उतरत्या पातळीवर असताना आणि मूल्यांकन अल्प असतानाही फार कमी गुंतवणूकदारांनी समभागांमध्ये गुंतवणूक केली आणि २०१० मध्ये मिळालेल्या लाभांची संधी हातातून घालवली.
सोन्याचे भाव चढे असतानाही गोल्ड ईटीएफने २०१२ मध्ये उच्च आवक नोंद केली आणि किंमती उतरल्यावर २०१४ मध्ये जावकचे प्रमाण वाढलेले दिसून आले. त्यामुळे असे दिसून येते की, जास्तीत-जास्त परतावे मिळवण्याची हुकमी संधी गुंतवणूकदारांनी वारंवार हातातून घालवलेली आहे. त्यामुळे मालमत्ता विभागणीवर लक्ष ठेवणे आणि मालमत्तांचे वर्ग नियमित स्वरुपावर संतुलित करत राहणे हा एक साधा आणि प्रभावी उपाय ठरू शकतो.
म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणारे बहुतेक सर्व गुंतवणूकदार ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेण्ट प्लॅन’ म्हणजेच ‘एसआयपी’मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. मात्र मालमत्ता विभागणी आणि पुर्नसतुलन यांकडे लक्ष दिले नाही तर सगळे मुसळ केरातच जाते! मालमत्ता विभागणीने सुरूवात तर उत्तम केली पण पुर्नसतुलन करण्यास विसरलो किंवा त्याकडे दुर्लक्ष झाले अशी बरीच उदाहरणे आहेत. पुर्नसतुलनामुळे मूळ मालमत्तेची विभागणी पुनप्रस्थापित करण्याकरिता उत्तम कामगिरी करत असलेल्या मालमत्ता वर्गाचे लाभ मिळवणे किंवा अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी करत असलेल्या मालमत्ता वर्गामध्ये अधिक गुंतवणूक करण्यास मदत होते.
एखाद्या गुंतवणूकदाराने १०० रुपयांपकी ७० रुपये समभागांमध्ये आणि ३० रुपये रोख्यात गुंतवले. त्यानंतर एका वर्षांमध्ये समभागांमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आणि कर्ज वर्गवारी आहे तशीच राहिली तर एका वर्षांनतर मालमत्तेची विभागणी समभागांमध्ये ७७ रुपये आणि रोख्यात ३० रुपये अशी असेल. त्यामुळे मूळ मालमत्तेची विभागणी (७०:३०) पुनप्रस्थापित करण्याकरिता समभागाचे ७ रूपये विकण्याची गरज असते. हे थोडय़ाफार फरकाने नफेखोरीसारखेच असते. गुंतवणूकदारांना गुंतवणूक पर्यायांची निवड योग्य तऱ्हेने करणे जमले तरीही मालमत्तेच्या योग्य विभागणीमुळे पोर्टफोलियोतील जोखीम कमी होण्यात आणि परतावे वाढवण्यात मदत होते. समजा, समभागांमध्ये चढ-उतार असतील तर कमी चढ-उतार असलेल्या कर्ज वर्गवारीमध्ये गुंतवणूक केल्याने संपूर्ण पोर्टफोलियोमध्ये येणाऱ्या चढ-उताराची जोखीम कमी होण्यात मदत होते. समभाग, रोखे आणि सोने या प्रमुख मालमत्ता वर्गवाऱ्यांतील कमी परताव्यांचा एकमेकांशी असलेला परस्पर संबंध हादेखील मालमत्ता विभागणी करण्यास उपयुक्त ठरू शकतो. याचाच अर्थ असा की, या मालमत्ता वर्गवाऱ्यांतील ‘बुल’ किंवा ‘बिअर’ वर्तुळ एकसारखे नसतात. त्यामुळे एक मालमत्ता वर्ग बिअर टप्प्यात असेल आणि पोर्टफोलियोतून मिळणाऱ्या परताव्यांमध्ये घसरण झाली तर इतर मालमत्ता वर्ग उत्तम कामगिरी करून ही घसरण भरून काढू शकतात. कमी परस्पर संबंध असलेल्या मालमत्ता वर्गामध्ये गुंतवणूक करण्याचा हा सर्वात मोठा फायदा असतो.
काही गुंतवणूकदारांना वेळ, प्रयत्न आणि लागणारा खर्च यांमुळे आपणाहून पुर्नसतुलन करणे शक्य होतेच असे नाही. उत्तम कामगिरी करणाऱ्या मालमत्ता वर्गामध्ये गुंतवणूक कायम ठेवण्याकडे गुंतवणूकदारांचा कल असल्याने गुंतवणूकदार पोर्टफोलियोचे नियमित तत्त्वावर पुर्नसतुलन करत नाहीत. अशा गुंतवणूकदारांकरिता म्युच्युअल फंड ‘रेडी टू युज’ मालमत्ता विभागणी उपाययोजना देऊ करतात. अशा उपाययोजनांमुळे गुंतवणूकदारांना पद्धतशीरपणे मालमत्ता वर्गात गुंतवणूक करण्यात, गुंतवणूक काढून घेण्यात मदत होते.
मालमत्ता विभागणीची साधी-सोपी उपाययोजना म्हणजे संतुलित निधी किंवा मासिक मिळकत योजना यांसारख्या हायब्रिड फंडमध्ये गुंतवणूक करणे. ते मालमत्तेची स्थायी विभागणी देऊ करतात. म्हणजे एखाद्या मालमत्ता वर्गामध्ये केलेले वाटप हे पूर्वनिश्चित असते आणि त्यात थोडीच फेरफार होऊ शकते. या टप्प्यात केलेले नेमके वाटप हे फंड व्यवस्थापकाच्या मालमत्ता वर्गाच्या दृष्टीकोनावर आधारलेले असते. उदा. मासिक मिळकत योजनांमध्ये समभागांमध्ये फार थोडी म्हणजे २०-३० टक्के गुंतवणूक केली जाते. दुसरा पर्याय म्हणजे डायनॅमिक अ‍ॅसेट अलोकेशन फंड्स (जे प्राईझ-अìनग किंवा पीई रेशोसारख्या मॉडेलवर काम करतात). जे समभाग गुंतवणुकीवरून कर्ज गुंतवणूकीत असे बदल करू शकतात किंवा मॉडेलनुसार दोन्हीमध्ये सम प्रमाणात गंतवणूक करू शकतात.तुम्हाला गुंतवणूकीत किती वैविध्य हवे यानुसार मालमत्ता वर्ग दोन (समभाग, रोखे), तीन (समभाग, रोखे, सोने) किंवा चार (समभाग, रोखे, सोने, रोख रक्कम) असेही असू शकतात.
यांमधील काही उपाययोजनांमध्ये धोरणात्मक विभागणी (अल्पतम कालावधीमध्ये बाजारपेठेत होणाऱ्या हालचालींपासून लाभ उठवण्याकरिता) तसेच मालमत्ता वर्गातील दीर्घकालीन धोरणात्मक विभागणी यांचा समावेश असतो. याकरिता साधे ‘पीई रेशो मॉडेल’ किंवा आíथक, मूल्यांकन, बाजारातील परिस्थिती यांवर आधारलेले ‘मल्टी-फॅक्टर मॉडेल’ वापरुन पुर्नसतुलन केले जाऊ शकते. या निदर्शकांमध्ये औद्योगिक वाढ, पीई रेशो, उत्पन्न, चलन या गोष्टी देखील विचारात घेतल्या जातात. त्यामुळे मालमत्तेची विभागणीविषयक उपाययोजनांमुळे अनेक मालमत्ता वर्गामधील गुंतवणूकीतून बाजारपेठेत एखाद्या क्षणी घडणाऱ्या घटनेचा लाभ उठवता येतो.
(लेखक फ्रँकलिन टेम्पल्टन इन्व्हेस्टमेंट्सचे (इंडिया) अध्यक्ष आहेत)