सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरण व विलिनीकरण विरोधात मंगळवारी (२२ ऑगस्ट) संप बँक कर्मचारी पुकारणार आहेत. नऊ संघटनांच्या नेतृत्वाखाली १० लाखांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत. मात्र या आंदोलनात खासगी क्षेत्रातील बँका नसतील.

स्टेट बँकेसह २१ बँकांमधील कर्मचारी, अधिकारी वर्ग मंगळवारच्या एक दिवसांच्या संपात सहभागी होत असल्याची घोषणा संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या ‘यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन’ (यूएफबीयू) ने केली आहे. नऊहून अधिक बँक संघटना यात सहभागी आहेत. दरम्यान, खासगीकरण, विलिनीकरण तसेच अनुत्पादित कर्जे निर्लेखित करू नये, निर्ढावलेल्या कर्जदारांविरुद्ध गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करू द्यावी आदी मागण्यासाठी संपात क्षेत्रीय ग्रामीण बँकाही सहभागी होत असल्याची माहिती ‘एआयआरआरबीईए’चे सरचिटणीस सईद खान यांनी दिली.