बँक कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीच्या मागणीसाठी विभागीय संपाचा टप्पा पश्चिम भागात पोहोचला असून मुंबई, महाराष्ट्रासह गुजरात, गोवा राज्यांमध्ये शुक्रवारी एक दिवसाचा संप होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांचा या संपात मोठा सहभाग असण्याच्या शक्यतेने या भागातील बँक व्यवहार कोलमडून पडण्याची शक्यता आहे.
बँक व्यवस्थापनाची संघटना ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ व बँक कर्मचाऱ्यांची ‘युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियन्स’ (यूएफबीयू) यांच्या दरम्यान मुंबईत सोमवारी उपमुख्य कामगार आयुक्तांसमोर झालेल्या बैठकीत वेतनवाढीबाबत तोडगा न निघाल्याने संपाचे हत्यार उपसण्यात आले होते. बँक कर्मचाऱ्यांची २३ टक्के वेतनवाढीची मागणी आहे, तर बँक प्रशासन मात्र ११ टक्के वाढीवर ठाम आहे.
कर्मचारी संघटनेने विभागीय संप जाहीर केल्यानुसार दक्षिण, उत्तर व पूर्व भारतात गेल्या तीन दिवसांमध्ये आंदोलन पार पडले आहे. आता शुक्रवारी पश्चिम भारतात एक दिवसाचा संप पुकारण्यात येणार आहे. विविध नऊ बँक कर्मचारी संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या ‘यूएफबीयू’ने १२ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय संपदेखील पुकारला होता.
वेतनवाढीची बँक कर्मचाऱ्यांची मागणी नोव्हेंबर २०१२ पासून प्रलंबित आहे. याबाबत एप्रिल २०१० मध्ये करण्यात आलेल्या कराराची मुदत दोन वर्षांपूर्वीच संपली. सुधारित करारासाठी वाढीव टक्केवारीबाबत संघटना व बँक व्यवस्थापन यांच्यात अद्याप मार्ग निघालेला नाही. कर्मचारी संघटनेने २५ टक्क्य़ांवरून २३ टक्क्य़ांपर्यंत वेतनवाढ स्वीकारण्याची तयारी दाखविली आहे तर   व्यवस्थापन मात्र ११ टक्क्य़ांच्या वर वेतनवाढ देण्यास राजी नाही.