वस्त्रोद्योगात वापरात येणाऱ्या रंगांसाठी आवश्यक रसायनांची निर्माती व निर्यातदार कंपनी मुंबईस्थित श्री पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि.ने आपल्या आगामी विस्तार कार्यक्रमासाठी प्रारंभिक खुल्या भागविक्रीतून निधी उभारण्याचे गुरुवारी प्रस्तावित केले. चिपळूण येथे लोटे पर्शुराम औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पातून कंपनी सध्या उत्पादन घेत असून, त्याच वसाहतीत नवीन प्रकल्प सुरू करण्याची तिची योजना आहे.
लोटय़ातील श्री पुष्करचा विद्यमान प्रकल्प हा देशातील काही मोजक्या ‘शून्य उर्वरक’ व संपूर्ण प्रदूषणमुक्त प्रकल्पांपैकी एक आहे. उत्पादन प्रक्रियेतून उत्सर्जित टाकाऊ घटकांवर प्रक्रिया करून नवनवीन उत्पादनांची मालिका विकसित करीत कंपनीने गत दीड-दशकात विविध १० उत्पादनांचे भांडार विकसित केले असून, आम्ल रसायने, खते, पशूखाद्य आणि जमिनीची सुपीकता वाढवणारे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. यापुढे औद्योगिक वापराच्या रंगांच्या (डाइज) निर्मितीचा प्रकल्प स्थापण्याचे कंपनीचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.
श्री पुष्करने १० रु. दर्शनी मूल्याचे ७० कोटी समभाग विक्रीस खुले केले असून, प्रत्येकी ६१ रु. ते ६५ रु. या किमत पट्टय़ादरम्यान गुंतवणूकदारांना या समभागांसाठी बोली लावता येईल. मंगळवार २५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान भागविक्री खुली राहील. या भागविक्रीमार्फत कंपनीत २००९ मध्ये भागभांडवली गुंतवणूक करणाऱ्या आयएफसीआय व्हेंचर कॅपिटल फंडांचा भागहिस्सा सध्याच्या ११.३० टक्क्य़ांपैकी नऊ टक्के हिस्साही सौम्य होणार आहे. तर भागविक्रीतून येणाऱ्या उर्वरित निधीचा वापर सध्याच्या उत्पादनांच्या क्षमता विस्तारासाठी आणि नवीन प्रकल्पाच्या उभारण्यासाठी वापरण्यात येणार आहे.